वकील भूषण महाडिक आरोपीच्या जामिनाविषयी बोलताना मुंबई Abhishek Ghosalkar Murder Case :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 9 फेब्रुवारी 2024 रोजी फेसबुक लाईव्ह दरम्यान हत्या करून मॉरिसने स्वत: आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून मॉरिस याचा अंगरक्षक अमरिंदर मिश्रा याचा जामीन अर्ज मुंबईच्या सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्याची पोलीस कोठडी 5 मार्चपर्यंत वाढवलेली आहे.
आरोपीला 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी :अभिषेक घोसाळकर यांचा थंड डोक्यानं 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी खून करण्यात आला होता. हा खून आरोपी मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयामध्ये केला आणि या संपूर्ण घटनेचं थेट फेसबुक प्रक्षेपण देखील केल्याचं अवघ्या जगानं प्रसार माध्यमातून पाहिलं. या प्रकरणात कथित आत्महत्या केलेला आरोपी मॉरिस याचा अंगरक्षक अमरिंदर मिश्रा याचा देखील हात असल्याचा संशय पोलिसांना होता. 10 फेब्रुवारीपासून तो मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. त्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयामध्ये आरोपीनं जामीन मिळण्याकरता अर्ज केला होता; मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश ससाणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी हा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. तसंच 5 मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
आरोपीनं जिवंत काडतूस विकत घेतलं :मयत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी वकिलांद्वारे युक्तिवाद केला की, घटना घडली त्याच्या एक दिवस आधी खून करणारा मॉरिस याचा अंगरक्षक अमरिंदर मिश्रा हा घटनास्थळी उपस्थित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज स्पष्टपणे समोर येतं. आरोपी मिश्रा यानं डिसेंबर 2023 मध्ये मुंबई मधून काडतुस विकत घेतले. त्यावेळेला मॉरीस आणि अमरिंदर मिश्रा सोबत होते. जिवंत काडतुस विकत घेण्यामध्ये आरोपीनेच मदत केलेली आहे.
काय आहे सरकारी पक्षाचं म्हणणं :सरकारी पक्षाच्या वकिलांचं म्हणणं होतं की, ''सीसीटीव्हीमध्ये मॉरिसने स्वतःवर गोळी झाडल्याचा पुरावा नाही. त्यामुळे ही दुहेरी हत्या आहे का? हे तपासणं जरूरी आहे. त्यामुळे त्याचा कोणी खून केलाय किंवा काय हे तपासणं आवश्यक आहे. तर आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं की, आरोपीला त्या ठिकाणी एक लॉकर देण्यात आलं होतं. त्यात त्यानं बंदूक ठेवली होती. त्याची चावी देखील त्याच्याकडे होती. घटना घडली त्यावेळेला आरोपी तिथं नव्हता. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करावा.
आरोपीनं स्वतःची बंदुक मॉरिसकडे कशी दिली :सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला की, आरोपी मिश्राला बंदूक स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी होती. त्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांकडे नियमानुसार देणं बंधनकारक होतं. त्याच्या मालकीची परवाना असलेली बंदूक दुसऱ्याच्या ताब्यात ठेवण्यास आरोपीनं सहमती कशी दिली?, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी होणं जरूरी आहे. असं सांगून सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जास विरोध केला.
न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला :सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश ए ससाणे यांनी येथे उपलब्ध तथ्याच्या आधारे चौकशीकरिता आरोपी अमरिंदर मिश्रा याचा जामीन अर्ज फेटाळला. 5 मार्च 2024 पर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवलेली आहे. पुढील सुनावणी 5 मार्च रोजी न्यायालयानं निश्चित केलेली आहे.
काय म्हणाले वकील भूषण महाडिक :तेजस्विनी घोसाळकर यांचे वकील भूषण महाडिक म्हणाले की, घटना घडण्याच्या एक दिवस आधी 8 फेब्रुवारी रोजी घटनास्थळी संशयास्पदरित्या आरोपी तिथे आढळला होता. हा त्या ठिकाणी कोणाशीतरी बोलत होता आणि थोड्या वेळानं तो तिथून पळ काढताना दिसत आहे, हे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होतय. त्यामुळे या घटनेची सकल चौकशी गरजेची आहे. म्हणून आरोपीच्या जामीन अर्जाला आज (2 मार्च) आम्ही विरोध केला. शेवटी न्यायालयानं आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे.
हेही वाचा :
- 'नमो रोजगार मेळाव्या'निमित्त काका-पुतण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच मंचावर
- 'तीन दिवसात माफी मागा'; नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?
- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; बलात्कारी गुंडासह त्याच्या साथीदारांना वीस वर्षाचा सश्रम कारावास