मुंबई Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसानं देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबईत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं मुंबईकरांचा मुख्य आधार असलेली उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळं अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहे. जी परिस्थिती रेल्वे रुळांवर आहे, तीच परिस्थिती मुंबईतील भुयारी मार्ग आणि रस्त्यांवर देखील आहे. त्यामुळं गाड्यांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जायला उशीर होऊ नये यासाठी मुंबईकर धडपडताना दिसत आहेत. मात्र, अशावेळी प्रश्न पडतो, तो मे महिना अखेरपर्यंत पावसाळी पूर्व नियोजनाची सर्व कामं पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पावसाला तोंड देण्यास अपयशी ठरलं का?
पालिकेचा दावा फोल : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पावसाळापूर्वी सर्व कामं झाल्याचा दावा केला होता. मात्र, रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पालिकेचा हा दावा फोल ठरल्याचं दिसून येतं आहे. पालिका प्रशासनानं मुंबईत ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं अशा ठिकाणी 481 उपसा पंप बसवण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. सोबतच अंडरग्राउंड पाण्याच्या साठवण टाक्या बसवण्यात आल्याचं देखील पालिकेनं म्हटलं होतं. मात्र, सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्यानंतर पालिकेच्या दाव्याप्रमाणे पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. सोबतच पालिकेनं करोडो रुपयांचा निधी खर्च करुन मुंबईतील नदी नाल्यातील गाळ उपसा केला. मात्र, पालिकेचं हे काम देखील दरवर्षीप्रमाणे गाळातच गेल्याचं दिसून येतं आहे.
कामं केल्याचा रेल्वे प्रशासानचा दावा : रेल्वे प्रशासनाची स्थिती महानगरपालिकेपेक्षा काही वेगळी नाही. मध्य रेल्वेनं मुसळधार पावसानं बाधित होणारी 24 रेल्वे स्थानकं निश्चित करुन विविध ठिकाणी 100HP क्षमतेचे 192 पंप बसवण्यात आल्याचं म्हटलं होतं. सोबतच, उपनगरीय विभागातील 119.82 किमी नाल्यांचे गाळ काढणे आणि साफसफाई तसंच कुर्ला-ट्रॉम्बे, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टिळक नगर इथं सर्व 156 कल्व्हर्ट स्वच्छ केले गेले आहेत आणि काही आरसीसी बॉक्सनं वाढवले आहेत. पावसाळ्यात सुरक्षित परिचालनासाठी ईएमयूचे सर्व 157 रेक सील केले. ओव्हर हेड वायर जवळील 6 हजारहून अधिक झाडांच्या फांद्या छाटल्या. 16 हजार इन्सुलेटर साफ आणि अर्थिंग, बाँडिंग आणि लाइटनिंग अरेस्टर्स तपासले. इत्यादी काम केल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केला होता. मात्र, या पावसानं रेल्वेच्या कामांनाच आता लाल सिग्नल दिल्याचं दिसून येतं आहे.
2005 मध्ये झाली होती अतिवृष्टी : जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीमुळं सर्वाधिक नुकसान झालं. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 24 तासांत 900 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. इतकं पर्जन्यमान म्हणजे संपूर्ण जुलै महिन्यातला पाऊस 24 तासात झाल्याचं त्यावेळी तज्ञांनी म्हटलं होतं. त्यामुळं शहरातील रस्ते बंद झाले होते. बस, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली होती आणि संपूर्ण मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. त्या महाप्रलयात बुडून 1094 जीव गेले, तर सुमारे 500 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 2005 च्या महाप्रलयानंतर शासन आणि प्रशासन दोघांनाही जाग आली आणि तेव्हापासून मुंबईत सातत्यानं पावसाळापूर्व नियोजन सुरू झालं. मात्र 2005 ते 2024 मागील जवळपास 20 वर्षात दरवर्षी मुंबईत पाणी तुंबत असल्यानं प्रशासन नेमकं कोणत्या प्रकारचे नियोजन करतात? हा प्रश्न पडतो.