मुंबई : एकीकडे संपूर्ण जग सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असताना मुंबईतील तसंच राज्यभरातील काही बेशिस्त वाहन चालक मात्र
जल्लोषाच्या नावावर वाहतूक नियमांचा भंग करून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालत होते. अशा बेशिस्त वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी व ठाणे पोलिसांनी कारवाईचा दंडुका उागारला आहे.
मुंबई शहरातील प्रेक्षणीय स्थळे असलेल्या गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वांद्रे बँड स्टँड, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी अशा विविध ठिकाणी नागरिक नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं जमले होते. मात्र या ठिकाणी येताना व येथून परत जाताना त्यापैकी काही बेशिस्त वाहन चालकांनी वाहतूक नियमांचा भंग केला. त्यामुळं त्यांच्या स्वतःच्या व इतरांच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला. असे प्रकार करणाऱ्या तब्बल 17 हजार 800 बेशिस्त वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. अशा या बेशिस्त वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी ई चलनाची कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 89 लाख 19 हजार 750 रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.
ड्रंक अँन्ड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवून मद्यधुंद अवस्थेत, तसंच मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या 153 वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या बेशिस्त वाहन चालकांना मुंबई पोलिसांच्या कारवाईचा फटका बसला आहे.
कोणावर कारवाई झाली? -वाहतुकीस अडथळा होईल असे कृत्य करणाऱ्या 2893 वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1923 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. सिग्नल तोडलेल्या 1731 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अति वेगाने वाहन चालवणाऱ्या 842 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे नो एंट्री असलेल्या ठिकाणी किंवा एक दिशा मार्ग असलेल्या ठिकाणी वाहन घुसवणाऱ्या 868 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. स्टॉप लाईनच्या अगोदर वाहन थांबवणे अपेक्षित असताना त्याच्या पुढे जाऊन वाहन थांबवणाऱ्या 440 जणांना चलन देण्यात आले आहे. सीट बेल्ट न वापरलेल्या 432 जणांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. युनिफॉर्म परिधान केल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहन चालवणाऱ्या 200 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दुचाकीवर तिघांनी प्रवास करण्याच्या 123 प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी दंड ठोठावला आहे. वाहन चालवताना मोबाईलवर संवाद साधणाऱ्या 109 जणांविरोधात कारवाई करण्यात आले आहे. तसंच चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या 40 जणांविरोधात व विनाकारण कर्कश आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या वीस जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अति धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्या दोन जणांविरोधात कारवाई करण्यात आली. याशिवाय मोटर वाहन कायद्यातील विविध तरतुदीनुसार बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी 17 हजार 800 बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई करत त्यांच्याकडून 89 लाख 19 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ठाणे पोलिसांचीही कारवाई -ठाणे पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन व दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांनी 369 जणांच्या विरोधात कारवाई केली. त्यामध्ये ठाणे नगर, नौपाडा, कळवा, मुंब्रा, कोपरी, वागळे, कापूरबावडी कासारवडवली, भिवंडी, नारपोली, कोनगाव कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर अंबरनाथ, कोळशेवाडी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.