मुंबई- बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असलेल्या अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्लाप्रकरणी आता पोलिसांच्या तपासाने वेग घेतलाय. मंगळवारी पहाटे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनेच्या सीन रीक्रिएशनसाठी सैफ अली खानच्या राहत्या घरी म्हणजेच सद्गुरू शरण या इमारतीत पोहोचले. यावेळी पोलिसांनी सदर आरोपी इमारतीत कसा घुसला? आणि त्याने सैफ अली खानवर कसा चाकूने वार केला? हे तपासत आहेत. आता पोलिसांचं आणि गुन्हे शाखेचं पथक सैफ अली खानच्या घरी दाखल झालं असून, याबाबतीत अन्य पुरावे गोळा करण्याचे आणि त्याच्या अधिक तपासाचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. यातच आणखी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलीय.
गुन्हे शाखेच्या 20 अधिकाऱ्यांचं पथक : यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान हल्ला प्रकरणातील घटनाक्रम, टाईमलाईन जोडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या 20 अधिकाऱ्यांचं पथक सैफ अली खानच्या वांद्रे येथील सद्गुरु शरण या इमारतीत पहाटे साडेपाच वाजता दाखल झालंय. या पथकाने सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या गेट नंबर एकमधून इमारतीत प्रवेश केलाय, त्यानंतर जवळपास एक तासांहून अधिक वेळ गुन्हे शाखेचे हे पथक घटनास्थळावर होते आणि संपूर्ण घटनाक्रम समजून घेत होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार, सैफ अली खानच्या घरातून पळून सदर आरोपी वांद्रे स्थानकातून लोकल ट्रेनने दादरला गेल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस या सीन रीक्रिएशनमध्ये संबंधित आरोपीला वांद्रे बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशनलादेखील घेऊन गेले.
आरोपी मोहम्मद शहजाद जिन्याने खाली उतरून पळाला : पोलिसांच्या माहितीनुसार, सैफ अली खानवर चाकूने वार केल्यानंतर आरोपी मोहम्मद शहजाद जिन्याने खाली उतरून पळाला. पण या सगळ्यात तो दमला होता. त्यामुळे त्याने जवळच असलेल्या एका बागेत काही काळ विश्रांती केली. पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला त्या बागेतदेखील नेले होते, जिथे त्याने आराम केला. सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सदर आरोपी कुठे गेला? कसा गेला? या सर्व ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या. त्या ठिकाणचे सीन रीक्रिएट केल्यानंतर सदर आरोपीला पुन्हा एकदा वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. सध्या इथे त्याची अधिकची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
आरोपीने बाथरूमच्या खिडकीतून सैफच्या घरात प्रवेश केला : या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, अभिनेता सैफ अली खानच्या घरी सीन रिक्रिएशनसाठी गुन्हे शाखेच्या पथकासोबत फॉरेन्सिक टीम आणि ठसे तज्ज्ञदेखील होते. फॉरेन्सिक टीमने सैफच्या घराच्या बाथरूमच्या खिडक्या, इमर्जन्सी एक्झिट आणि पायऱ्यांवरून बोटांचे सुमारे 19 ठसे गोळा केल्याची माहिती मिळत आहे. त्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपीने बाथरूमच्या खिडकीतून सैफच्या घरात प्रवेश केला होता आणि हल्ल्यानंतर तो बाथरूमच्या खिडकीतूनच पसार झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
हल्ल्याला आता पाच दिवस झाले : दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ल्याला आता पाच दिवस झाले असून, शस्त्रक्रियेनंतर सैफला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. आज दुपारी दोन वाजता सैफ अली खानला प्राथमिक तपासणीनंतर लीलावती रुग्णालयाची वैद्यकीय टीम डिस्चार्ज देईल. त्यानंतर सैफ अली खान नेमका कोणत्या घरात जातो, तो पुन्हा एकदा वांद्र्याच्या आपल्या सद्गुरु शरण या इमारतीत जातो की अन्य कोणत्या घरी जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :