पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) हे आज (२२ फेब्रुवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत घरकुल योजनेतील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यातील बालेवडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच विविध नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ६००० लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं असून राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात ५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
असा असणार संपूर्ण दौरा : सकाळी ११ वाजता अमित शाहा यांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे. त्यानंतर हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी २:१५ वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला देखील सहकारमंत्री म्हणून अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ४:१५ वाजता ते बालेवाडी येथील श्री छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे प्रधानमंत्री आवास योजना 'ग्रामीण' (टप्पा-२) च्या अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण तसंच १० लाख पहिल्या हफ्त्याचे वितरण करणार आहेत.
वाहतुकीत बदल : अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलीस शाखेकडून देण्यात आलीय. त्यानुसार आज विद्यापीठ चौक ते चांदणी चौक दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. विद्यापीठ चौक ते बाणेर परिसरातील राधा चौक, बाणेर रस्ता, यासह विद्यापीठ चौक ते औंध येथील राजीव गांधी पूल या दरम्यान सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकातून (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) बाणेर रस्त्याने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकातून डावीकडं वळावं. तिथून भुयारी मार्गानं इच्छितस्थळी जाता येऊ शकतं. पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडं जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाऊ नये. पाषाण रस्त्याने चांदणी चौक किंवा विद्यापीठ चौकातून औंधमार्गे इच्छितस्थळी जावं. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून बाणेरकडं जाणाऱ्या सर्व वाहनांनी बालेवाडी जकात नाका चौकातून डावीकडं वळून हाय स्ट्रीटमार्गे जावं.
१० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण : अमित शाह यांच्या दौऱ्या संदर्भात अधिक माहिती देत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की, "राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा १ अंतर्गत मागील ७ वर्षात १३,५७,५६४ उद्दिष्टे होते. त्या तुलनेत सन २०२४-२५ या एका वर्षामध्ये टप्पा २ अंतर्गत महाराष्ट्र राज्यास २० लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. प्रति घरकुल रू १५०००/- प्रमाणे राज्यातील एकूण १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता रू. १५०० कोटी या समारंभात वितरित करण्यात येणार आहे. तसंच २० लाख घरकुल मंजुरीचे आदेश २८,००० ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी वाटप करण्यात येणार आहे."
हेही वाचा -