हैदराबाद- शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांचं व्हॉट्सअप अकांउट हॅक झालं आहे. त्यांच्या अकाउंटवरून जवळच्या व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत आहे.
हर्षल प्रधान यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअपवरून पैसे पाठवा, असे मेसेज पाठविले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही कॉल आणि मेसेजचा रिप्लाय देऊ नये, असे हर्षल प्रधान यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
निष्काळजीपणामुळे हॅकिंग होण्याची शक्यता- व्हॉट्सअॅपचा वापर जवळचे व्यक्ती, नातेवाईक, मित्रवर्तुळ यांच्याशी संपर्कात राहण्याकरिता करण्यात येतो. याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सअप हॅक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. व्हॉट्सअॅप हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असून सुरक्षित असल्याचा मेटा कंपनीकडून दावा करण्यात येतो. तरीही हॅकिंग कसे होते? सायबरतज्ञांच्या माहितीनुसार चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे व्हॉट्सअॅप हॅक होते. हे टाळण्याकरिता काही काळजी घ्यावी लागते.
अशी घ्या काळजी-तुमचा टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन कोणालाही देऊ नका. जेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाइसशी व्हॉट्सअप लिंक करण्यासाठी तुमचा फोन नंबर टाकून लॉग इन करता तेव्हा तुमच्या फोनवर एक नोंदणी कोड येतो. अशा परिस्थितीत, जर हा पिन कोड एखाद्याच्या हातात आला तर अज्ञात व्यक्ती तुमचं व्हॉट्सअप वापरू शकतो.
अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे टाळा- व्हॉट्सअॅप हॅकिंगचे आणखी एक कारण म्हणजे अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे आहे. हॅकर्स अनेकदा मेसेज किंवा ईमेलद्वारे अज्ञात लिंक्स पाठवतात. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या फोनचा अॅक्सेस हॅकरला मिळतो. यापूर्वी राष्ट्रवादीच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअप हॅक झालं होतं. त्यांनी स्वत:हून माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.
हेही वाचा-