पुणे : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. आता याबाबत पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. आज आरोग्य विभागानं तातडीची बैठक बोलावली असून यावर महापालिकेकडून आढावा घेतला जाणार आहे. तसंच एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात महापालिकेची टीम दाखल होणार आहे.
12 ते 30 वर्षाच्या वयोगटातल्या लोकांना होतो आजार : याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितलं, "याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होत आहे. ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, हा आजार लाखामध्ये एका व्यक्तीला होतो. पुणे महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांची माहिती घेतली असता २२ संशयित रुग्ण आढळून आले. यातील ६ केसेस या महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशी आहेत. यांचे सँपल हे एनआयव्हीला पाठविण्यात आले आहे. हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि या आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे 12 ते 30 वर्षाच्या दरम्यानच्या वयोगटातल्या लोकांना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचं कारण नाही. आज या आजारासंदर्भात तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. या सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे".
काय आहेत आजाराची लक्षणे? : "गुलेन बॅरी सिंड्रोम आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. तसंच याला वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरा होणारा हा आजार आहे. महापालिकेकडे आमची सक्षम यंत्रणा आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे चालताना तोल जातो आणि उभे राहताना अवघडल्यासारखं वाटतं" अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
हेही वाचा -