मुंबई Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाजवळ सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी जंबो ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेने जाहीर केलंय. गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून (30 सप्टेंबर) या ब्लॉगला सुरुवात होणार आहे. हा ब्लॉक 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या ब्लॉकमुळं राम मंदिर ते मालाड या स्थानकादरम्यान गाड्या 30 किलोमीटर प्रतितास वेगानं धावणार आहेत. वेगमर्यादा कमी केल्यामुळं गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दररोज सुमारे 175 लोकल सेवा रद्द होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 4 ऑक्टोबरपर्यंत काम जसजसं पुढं जाईल तसतसं वेगावरील निर्बंध हटवले जातील आणि रद्द होणाऱ्या गाड्यांची संख्याही कमी होईल.
पश्चिम रेल्वेवर सकाळच्या गर्दीच्या वेळी गोरेगाव येथून चार जलद लोकल चालवल्या जातात. मात्र, जंबो ब्लॉक दरम्यान गोरेगाव येथे लूप लाइन उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत चालणाऱ्या चार लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ब्लॉक दरम्यान मालाड स्थानकावर कट आणि कनेक्शनचं काम करण्यात आलं. या कामानंतर मालाड स्थानकाचा सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 करण्यात येणार आहे. तर पाचव्या मार्गावरील पॉइंट क्रमांक 105 आणि पॉइंट 109 चं काम रेल्वेकडून पूर्ण झालं असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीय.