मुंबई Mumbai High Court News : पुण्यातील बर्गर किंग आणि अमेरिकेतील बर्गर किंग यांच्यातील वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय. मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी (26 ऑगस्ट) पुणे न्यायालयाच्या 16 जुलै रोजी दिलेल्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तर या प्रकरणी 6 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. तोपर्यंत ही अंतरीम स्थगिती लागू राहील.
सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं? : पुण्यातील कोरेगाव पार्क आणि कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंग जॉइंटचे मालक अनाहिता आणि शापूर इराणी यांच्याविरोधात अमेरिकेतील बर्गर किंगनं दावा दाखल केला आहे. तर या संदर्भातील झालेल्या सुनावणी दरम्यान बर्गर किंगच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, 28 जानेवारी 2012 पासून पुणे न्यायालयानं कंपनीच्या बाजूनं मनाई आदेश दिला होता. मात्र, 16 जुलै रोजी या प्रकरणाचा निर्णय आल्यानंतर बर्गर किंग नाव पुण्यातील कंपनीनं वापरण्यास सुरुवात केल्याकडं वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. अमेरिकेतील बर्गर किंगतर्फे वकील आवेश कैसर आणि वकील हिरेन कामोद यांनी काम पाहिलं. तर पुण्यातील बर्गर तर्फे वकील अभिजीत सरवटे यांनी काम पाहिलं.
नेमका वाद काय? :भारतीय बाजारात 2014 मध्ये आलेल्या अमेरिकन बर्गर किंगला पुण्यात अशा प्रकारच्या नावाचे रेस्टॉरन्ट 2008 पासून असल्याची माहिती मिळाली. मात्र, पुण्यातील या रेस्टॉरंटतर्फे आपलं नाव वापरल्यानं आपल्या ब्रॅंडच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे भरुन न येण्याजोगे नुकसान होत असल्याचा दावा अमेरिकन बर्गर किंगतर्फे करण्यात आला होता. त्या सुनावणी दरम्यान दाव्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पुण्यातील रेस्टॉरन्टला बर्गर किंग हे नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. 16 जुलै रोजी या प्रकरणी पुणे न्यायालयानं अमेरिकन बर्गर किंग विरोधात आणि पुण्यातील रेस्टॉरन्टच्या बाजूनं निकाल दिला. आंतरराष्ट्रीय ब्रॅंड भारतात कार्यरत नसताना पुण्यातील रेस्टॉरन्टद्वारे हे नाव वापरलं जात होतं. त्या माध्यमातून खवय्यांना सेवा पुरवली जात होती. बर्गर किंग या नावानं ही सेवा पुरवली जात असल्यानं त्यांचे नाव आणि ब्रॅंड वैध असल्याचा निर्णय पुणे न्यायालयाने दिला होता.
अमेरिकन 'बर्गर किंग'ला दिलासा :अमेरिकन कंपनी 2014 मध्ये भारतात आली. मात्र, त्याच्या फार पूर्वीपासून 1991-92 पासून बर्गर किंग या ट्रेडमार्कने सेवा दिली जात होती. अमेरिकन कंपनीनं 1991-92 पूर्वीच्या भारतातील ट्रेडमार्कच्या नोंदणीबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर केलं नाही. तर दुसरीकडं पुण्यातील रेस्टॉरन्ट मालकांनी बर्गर किंग नावाचा ट्रेडमार्क 6 डिसेंबर 2006 रोजी नोंदणी केला होता. या प्रकरणात प्रतिवादी हे पूर्वीपासून हा ट्रेडमार्क वापरत असल्यानं वादींना त्याला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही, असा निर्वाळा न्यायालयानं दिला होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयानं पुणे न्यायालयाच्या या निर्णयाला 6 सप्टेंबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळं अमेरिकन 'बर्गर किंग'ला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -
- मुंबई उच्च न्यायालयाच्या 'त्या' निर्णयावर असीम सरोदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आंदोलनाच्या स्वातंत्र्यावर गदा..." - Asim Sarode On High Court Decision
- महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News
- न्यायालयानं दखल घेतल्यानंतर जबाब नोंदवले; मुंबई उच्च न्यायालयानं पोलीस तपासावर ओढले ताशेरे - Badlapur Sexual Assault Case