महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची भीती दाखवून व्यावसायिकाला 2.18 कोटींचा गंडा - Mumbai Cyber Fraud

Mumbai Cyber Fraud News : मुंबईत सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एका व्यावसायिकाची तब्बल 2 कोटी 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आलीय.

Mumbai Cyber Fraud News
सायबर फ्रॉड प्रकरण (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 9:06 AM IST

मुंबई Mumbai Cyber Fraud News : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बँक खात्याचा वापर झाल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. कारवाईची भीती घालून सायबर ठगांनी 76 वर्षीय व्यावसायिकाला तब्बल 2 कोटी 18 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात. या प्रकरणी दक्षिण सायबर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दिलीय.

नेमकं काय आहे प्रकरण? :तक्रारदार व्यावसायिक पत्नीसोबत नेपियन्सी रोड परिसरात वास्तव्यास आहेत. रे रोड येथे त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 11 एप्रिलला त्यांना अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं वांद्रे गुन्हे शाखेतून संदीप राव बोलत असल्याची बतावणी केली. पीडित व्यक्तीच्या आधारकार्डवरून सिमकार्ड खरेदी करण्यात आल्याचं सायबर गुन्हेगारानं सांगितलं. तोतया संदीप राव यानं तक्राकदाराकडं आधारकार्डची मागणी केली. पुढं, कॅनरा बँकेशी संबंधित 538.62 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणात ईडीनं अटक केलेल्या नरेश गोयल यांच्या विरोधात दाखल असलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात पीडितच्या खात्याचा समावेश असल्याबाबतची कागदपत्रं पाठविण्यात आली.



गोपनीय माहिती असल्याची मारली थाप : सर्वोच्च न्यायालयाच्या नावानं असलेल्या कागदपत्रात आपलं नाव दिसल्यानं ज्येष्ठ नागरिक घाबरले. ही गोपनीय माहिती असल्यानं याची कुणाकडंही वाच्यता करू नये, असं तक्रारदारांना बजावण्यात आलं. तसंच, त्यांना कागदपत्रांसह ऑनलाईन चौकशीला तयार राहण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर, सीबीआय अधिकारी आकाश कल्हारी असं नाव सांगून चौकशी करत असल्याचं भासविले. सायबर ठगांनी तक्रारदाराकडून 12 एप्रिल ते 20 एप्रिल याकाळात तब्बल 2 कोटी 18 लाख रुपये उकळले.

बनावट कागदपत्रं पाठवून व्यावसायिकाची फसवणूक-सायबर ठगांनी मुंबई गुन्हे शाखेसह सीबीआय, आरबीआय, आयकर, ईडी अशा विविध यंत्रणांच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रं पाठवून व्यावसायिकाची फसवणूक केली होती. तक्रारदारांनी आपल्या विश्वासातील एका व्यक्तीला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचं त्यांना समजलं. अखेर, त्यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाणे गाठत या फसवणुकीची तक्रार दिली आहे.

हेही वाचा -

  1. चित्रकाराने महिलेला घातला 1 कोटींचा गंडा; शेअर बाजारात दुप्पट नफा मिळवून देण्याचं दाखवलं आमिष - Mumbai Cyber Fraud
  2. महाराष्ट्र सायबर सेलचं यश, गेल्या चार वर्षांत गोठविले 222. 99 कोटी रुपये - Maharashtra Cyber ​​Cell
  3. मानवी तस्करी सायबर फ्रॉड प्रकरण : एनआयएची देशभरात छापेमारी, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या - Human Trafficking And Cyber Fraud

ABOUT THE AUTHOR

...view details