मुंबई Mumbai Fraud Case : इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीला गजाआड करण्यात पश्चिम विभाग सायबर पोलिसांना यश आलंय. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलनं 3.62 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एका संशयिताला अटक केलीय. या प्रकरणी फकरुद्दीन युसूफ बागसारवाला यांनी तक्रार दाखल केली होती. एका महिलेनं गुंतवणुकीच्या नावाखाली व्हॉट्सॲपद्वारे फसवणूक केल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होते.
खोटं ऑनलाईन अॅग्रीमेंट: फकरुद्दीन बगसरावाला यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या वर्षी 20 मे ते 7 ऑक्टोबर दरम्यान कला ऑनचिरा, स्टेला या दोन महिलांसह पॉल ट्युडोर नावाच्या व्यक्तीनं गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे जमा केले होते. त्यांनी व्हाट्सअॅपवर ग्रुप तयार करून ऑनलाईन अॅग्रीमेंट बनवलं होतं. फसवणूक करणाऱ्यांनी खोटं ऑनलाईन अॅग्रीमेंट बगसरावाला यांना पाठवत त्यांच्याकडून गुंतवणूक करुन घेतली होती. गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला नफा मिळेल, असं आमिष त्यांनी दाखलं होतं. त्यामुळं फिर्यादीनं त्यांना 3 कोटी 61 हजार 426 रुपये दिले होते.