मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका रिक्षा चालकानं एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर एका महिलेवर हमालानं अत्याचार (physical abuse) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं सांगितलं जातय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उत्तराखंडमधून आपल्या मुलासोबत मुंबई फिरण्यासाठी आली होती.
आरोपीला ठोकल्या बेड्या : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी रात्री आपल्या नातेवाईकांकडं जाणार होती. त्यामुळं काही वेळासाठी ती वांद्रे स्थानकावर झोपली. यावेळी तिकिट तपासण्याच्या बहाण्यानं एक 27 वर्षीय हमाल महिलेजवळ आला. त्यानं तुमच्याकडचं तिकिट दाखवा, असं म्हणत महिलेला बाजूला असलेल्या एका मोकळ्या रेल्वेच्या डब्यात नेलं. यावेळी आरोपीनं जबरदस्तीनं महिलेवर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेनं रेल्वे पोलिसांकडं धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या.