मुंबई Mulund Hit And Run :मुलुंड परिसरातील डम्पिंग ग्राउंड रोड येथे सोमवारी सकाळी एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात एकूण चारजण जखमी झाले आहेत. त्यातील रिक्षा चालकाची प्रकृती स्थिर असून मल्टिपल फ्रॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी : ऑडी चालक भरधाव वेगात मुलुंड डम्पिंग रोड मार्गावरून जात असताना त्याचा ऑडी कारवरील ताबा सुटला. त्यानंतर त्याने दोन रिक्षांना जबर धडक दिली. त्यातील एका रिक्षात दोन प्रवासी होते. त्यांच्यासह दोन्ही रिक्षा चालकही जखमी झाले असून एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर होती. जखमींना अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात दोन्ही रिक्षांचे ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी झाले आहेत. एक रेल्वे कर्मचारी तर दुसरा बेस्ट खात्यात काम करणारा कर्मचारी रिक्षातून प्रवास करत होते. यामध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? :पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितलं की, आरोपी कार चालक विजय गोरे (वय ४३) याला त्याच्या बहिणीच्या कांजूर मार्ग येथील घरून अटक करण्यात आली आहे. आरोपीची मेडिकल करून रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. मेडिकल दरम्यान त्याच्या तोंडाला देखील दारूचा वास येत असल्यानं डॉक्टरांनी सांगितलं. ड्रंक अँड ड्राईव्हचे कलम देखील या गुन्ह्यात वाढवण्यात आले आहे. पुढील तपास मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे.
दोन रिक्षांना समोरून दिली धडक :विजय दत्तात्रय गोरे (वय ४३) असे अपघाताप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑडी चालकाचे नाव आहे. विजय कांजूरमार्ग पश्चिम येथील रूनवाल फॉरेस्ट या ठिकाणी पत्नी आणि मुलांसह राहण्यास आहे. विजय हा एका आयटी कंपनीत नोकरीला असून तो 'वर्क फॉर्म होम' काम करतो. रविवारी रात्री विजयने भांडुपच्या एका बारमध्ये मद्यपान केले, त्यानंतर तो स्वतःची ऑडी मोटार (एमएच- ०१ -बीके-०११९) स्वतः चालवत ठाण्याला गेला. त्या ठिकाणी मित्रांसोबत मद्यपान केल्यानंतर त्याचे काही मित्र आणि विजय कर्जतला गेले. रात्रभर मौजमजा केल्यानंतर सोमवारी पहाटे ६ वाजता विजय हा ठाण्यात आला. त्या ठिकाणी त्याने मित्रांना सोडून मुंबईच्या दिशेने जाताना मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड येथे भरधाव वेगात असलेल्या ऑडीने प्रवाशी घेऊन मुलुंड स्थानकाकडे निघालेल्या दोन रिक्षांना समोरून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, दोन्ही रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या विजयने मोटार तेथेच सोडून पळून गेला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मुलुंड पोलीसांना कळवून जखमींना रिक्षातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.