महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस पावसाळ्यात उगवलेली छत्री; संजय राऊतांचा हल्लाबोल, राणे म्हणाले, राऊत पावसाळ्यातील.... - Sanjay Raut

Sanjay Raut On Devendra Fadnavis : खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay Raut
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 4:15 PM IST

मुंबई Sanjay Raut On Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीत 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करणारे बॅनर लागले ही लोकभावना आहे. सत्तेच्या बळावर मोदी आणि शाह यांनी शिवसेना पक्ष ओरबडून गद्दारांच्या हातात दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

फडणवीसांवर टीका : "देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे. जसं आता राजस्थान, मध्य प्रदेश या भागांमध्ये मुख्यमंत्री नेमले गेले. मात्र, कोणालाच माहीत नव्हतं. त्याचप्रमाणे त्याकाळी मुख्यमंत्रिपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून फडणवीस यांना ते पद दिलं गेल्याने महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस माहिती झाले. देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती. पण कपटकारस्थानचा राजकारण, दळभद्री राजकारण, महारष्ट्र कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्याने त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला," अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

नितेश राणेंचा पलटवार : संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. या टीकेला आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. "संजय राऊत हे पावसाळ्यातील गमबूट आहेत. त्यांनी फडणवीस यांच्यासारख्या महान नेत्यांवर बोलू नये," असं म्हणत राणेंनी राऊतांवर पलटवार केला.

पक्ष ओरबाडून घेतला : "नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबाडून घेतली. आमचं चिन्ह, पक्ष घेतला आणि गद्दाराच्या हातात पक्ष सोपवला. त्यांना वाटलं शिवसेना आणि नेतृत्व संपेल. पण त्या संकट काळात देखील उद्धव ठाकरे जिद्दीने उभे राहिले. त्यांनी आपला पक्ष नव्याने उभा केला. वेगळ्या चिन्हावर नऊ खासदार निवडून आणले. आज आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकत आहोत. हे सोपं नाही. राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. लोक बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करत होते. तेवढंच प्रेम ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात," असं म्हणत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.

भावी मुख्यमंत्री लोकभावना : "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीत चंद्रहार पाटील यांनी 'भावी मुख्यमंत्री' असे बॅनर लावले आहेत. या लोकभावना आहेत. पोस्टर किंवा बॅनर लावा असं आम्ही सांगत नाहीत तर त्या भावना लोकं अशा पद्धतीनं व्यक्त करत असतात. त्याबद्दल कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही. काही पक्षात तीन तीन नेत्यांचे बॅनर लागतात 'भावी मुख्यमंत्री' म्हणून, महायुतीत सात लोकं मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी संकट काळात राज्याचे जे नेतृत्व केले ते लोकांना मान्य आहे. राज्य आणि देश संकटात असताना ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं रक्षण केलं ते लोक विसरले नाहीत. एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. संघर्षातून ते फिनिक्स पक्षासारखे उभे राहिले," असं राऊत म्हणाले.

जनता आम्हाला विधानसभेतही आशीर्वाद देईल : "राज्याची बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते. याला जबाबदार ते स्वतःच आहेत. नेतृत्वाची संधी त्यांनी गमावली असून भाजपाने महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. ते भरून निघणे शक्य नाही. त्यासाठी पुन्हा एकदा सत्तेत आम्हाला बसावं लागेल. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलीली घाण आम्हाला स्वच्छ करावी लागेल. या राज्यातील जनतेने आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला. या राज्यातील जनता आम्हाला विधानसभेतही आशीर्वाद देईल. फडणवीस यांच्याबद्दल एवढेच सांगेन की त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृह खात्याचा देखील गैरवापर केला," असा आरोप संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केला.

हेही वाचा

  1. अजित पवारांना झटका: आमदारकीची टर्म संपताच बाबाजानी दुर्राणी यांची 'घरवापसी' - Babajani Durrani
  2. "भाजपाचा क्लिपचा कारखाना असून तेच..."-संजय राऊत - Sanjay Raut News
  3. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं अटक करा; 'ठोकून काढा' वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल - Raut Demand Arrest To Fadnavis

ABOUT THE AUTHOR

...view details