महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जात आहे? अमोल कोल्हेंचा सवाल - Shirur Lok Sabha election - SHIRUR LOK SABHA ELECTION

Amol Kolhe Vs Ajit Pawar : शिरुर लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपावरून केलेल्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार कोल्हे यांनी वाढती महागाईसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. ते माध्यमांशी बोलत होते.

Amol Kolhe On Unemployment
डॉ. अमोल कोल्हे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 5:26 PM IST

डॉ. अमोल कोल्हे यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

पुणेAmol Kolhe Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच नगरसेवक व्हायचं असेल तर कामाला लागा. निधी वाटपाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं होते. खासदार कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसायला लागला की, अशा पद्धतीने दबाव तंत्र हे वापरलं जात आहे. पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, " नगरसेवक होण्यापेक्षा देशातील महागाई कमी होणार का? शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का? बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज गुजरातच्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक न्याय दिला जात आहे. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जात आहे? असा खोचक प्रश्न यावेळी खासदार कोल्हे यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे :महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आज पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असून शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ते सभा घेत मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, " आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे. आज देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागत आहे. यातच इंडिया आघाडीचा विजय आहे, " यावेळी कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दमदाटीला सर्वसामान्य जनता उत्तर देईल :बारामती तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याकडून दमदाटी केली जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "वारंवार निधीबाबत सांगितलं जात आहे. निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील हा पैसा असतो. निधी हा कोणाच्याही मालकीचा नाही. अशा दमदाटीला सर्वसामान्य जनता या माध्यमातून उत्तर देणार आहे. निवडणूक हातातून निसटते तेव्हा अशा पद्धतीने दमदाटी केली जाते," असं यावेळी खासदार कोल्हे म्हणाले.

कोल्हेंचा अजित पवारांना टोला :अजित पवार यांना पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीच बारामतीत अडकावं लागत आहे का? याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, "एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर चार जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे? हे आपण समजावं. त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते. तर एक पत्नींना उमेदवारी द्यावी लागते. दोन उमेदवार हे बाहेरून आयात करावे लागत आहेत. आता यातच काय परिस्थिती आहे? हे आपल्याला माहीत आहे," असा टोला यावेळी कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

सरकारच्या विचाराचे खासदार नसल्याने निधी भेटला नाही : "बारामतीत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सरकारच्या विचाराचे खासदार नव्हते. म्हणून निधी भेटला नाही", असं वक्तव्य अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "हे जर खरं असेल तर सर्वसामान्य जनतेनं याचा विचार करावा. जनतेच्या कर रूपाचा पैसा हा लोकप्रतिनिधीकडून विकासासाठी वापरण्यात येतो. जर विचाराचा उमेदवार नाही म्हणून निधी नाही. असं जर असेल तर ते लोकशाही प्रणालीला घातक आहे, " यावेळी खासदार कोल्हे म्हणाले.

हेही वाचा :

  1. "...तर तुम्हाला बारामतीत दूधच विकावं लागलं असतं"; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Sanjay Raut on Ajit Pawar
  2. "बाकीचं नंतर बोला, आधी बारामतीत..."; पुतण्याचं काकाला थेट आव्हान - Rohit Pawar Challenge Ajit Pawar
  3. महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW

ABOUT THE AUTHOR

...view details