नवी दिल्ली/ मुंबई Maharashtra Ministers Portfolio : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर रविवारी (9 जून) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि मित्रपक्षांच्या 71 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्र्यांना आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून, यात महत्त्वाची खाती भाजपानं आपल्याकडेच ठेवल्याचं दिसून येतंय. मोदींच्या नेतृत्वाखालील या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. त्यात 2 कॅबिनेट, 1 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि 3 राज्यमंत्र्यांचा रविवारी शपथविधी झाला.
राज्यातील दोघांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी : राज्यातून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सहा जणांपैकी नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. तर शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडं स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. तसंच रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रिपाईचे रामदास आठवले यांच्याकडं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं.
गडकरी पुन्हा रोडकरी : महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची हॅट्रिक करणाऱ्या नितीन गडकरींना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय देण्यात आलं. तर राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यानं निवडून आलेले उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पियूष गोयल यांना पुन्हा एकदा वाणिज्य खात्याचं मंत्री करण्यात आलं. तसंच महाराष्ट्रातील इतर 4 राज्यमंत्र्यांसाठी देखील खातेवाटप जाहीर करण्यात आलं.
रक्षा खडसे करणार युवकांचं कल्याण : रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं. तर शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
पहिल्यादाच खासदार झालेल्या मोहोळांना भारदस्त खातं : शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून पहिल्यांदाच खासदारी लढवत जिंकून येणारे भाजपाचे नवनिर्वाचित युवा खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यांना थेट सहकार आणि नागरी उड्डाणसारख्या भारदस्त खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. तसंच खासदार रामदास आठवले यांना पुन्हा एकदा समाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाचं राज्यमंत्री करण्यात आलं. मागील दोन्ही सरकारमध्ये आठवलेंकडं हेच खातं होतं.
राज्यातून कोणाला कोणतं खातं :
- नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
- पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्री
- प्रतापराव जाधव - केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
- रामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
- रक्षा खडसे - केंद्रीय राज्यमंत्री : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
- मुरलीधर मोहोळ - केंद्रीय राज्यमंत्री : सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय
हेही वाचा :
- मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, महाराष्ट्राच्या वाट्याला 'ही' महत्त्वाची खाती - Modi Cabinet Portfolio
- मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' शिलेदारांनी घेतली शपथ; जाणून घ्या, राजकीय प्रोफाईल - Narendra Modi Oath Ceremony