महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये बंडखोर उमेदवारांवर मनसेची नजर; राज ठाकरेंची नेमकी रणनीती काय?

एकेकाळी मनसेचा गड असलेल्या नाशिकमध्ये मनसेला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने नाशिकच्या उमेदवारांची घोषणा मनसेकडून झाली नाही, अशात महाविकास आघाडी, महायुतीच्या बंडखोर उमेदवारांवर मनसेचा डोळा आहे.

Nashik MNS candidate
नाशिक मनसे उमेदवार (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

नाशिकःविधानसभा निवडणुका जाहीर होताच तयारीतच असलेले प्रमुख राजकीय पक्षांची लगबग सुरू झालीय. घोषणा, प्रतिघोषणा, आव्हाने, प्रतिआव्हाने यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व जागा लढविण्याचे स्पष्ट संकेत देत मरगळलेल्या मनसैनिकांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता होती. परंतु महायुती आणि महविकास आघाडीतील अर्ध्याहून अधिक उमेदवार जाहीर होऊनही मनसेच्या राजगडावर अजून शांतता आहे.

मनसे वेट अँड वॉचच्या भूमिकेत:नाशिक जिल्ह्यातील मनसेची स्थिती संभ्रमावस्थेत आहे. नाशिक शहरातील चारही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास स्पष्ट झाली असून, मनसे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. दरम्यान, प्रबळ उमेदवारच मनसेला मिळेना अशी परिस्थिती स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर उभी राहिलीय. त्यापेक्षा आयता उमेदवार उभा करण्याकडे मनसेचा कल आहे. म्हणजे तिकीट न मिळालेल्या बंडखोरास आपल्या पक्षात घेऊन त्याला बोहल्यावर उभा करण्यासाठी आता धडपड सुरू आहे. वारंवार आपली भूमिका बदलती ठेवून कार्यकर्त्यांचा अंत पाहणाऱ्या राज ठाकरेच्या पक्षाला आता घरघर लागलीय. एकेकाळी तीन-तीन आमदार देणाऱ्या नाशिक शहरात मनसेला उमेदवार मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे.

या उमेदवारांना विचारणा : नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारलाय, यातील नगरसेवक दिनकर पाटील आणि शशिकांत जाधव हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असून, त्यांना मनसेकडून विचारणा झालीय, नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाकडून राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने येथील इच्छुक असलेले उद्धव निमसे काहीसे नाराज झाले असून, त्यांनीदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्यासाठी चाचपणी केलीय, त्यांनाही मनसेकडून विचारणा झालीय.

लवकरच उमेदवार जाहीर होतील :भाजपा नगरसेवक दिनकर पाटील हे लवकरच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करणार आहेत. तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असं मनसेकडून सांगितलं जात आहे. तसेच मनसेकडून नाशिक जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघांसाठी लवकरच उमेदवार जाहीर होतील, असंसुद्धा मनसे पदाधिकारी सलीम शेख यांनी सागितलंय.

नाशिकमध्ये मनसेचा इतिहास: 2006 रोजी मनसेची स्थापना झाली आणि 2007 मध्ये मनसेने महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुका लढवल्या, यात मुंबई महापालिकेत 7, पुणे महापालिकेत 8, नाशिक महापालिकेत 12 आणि ठाणे महापालिकेत तीन नगरसेवक निवडून आलेत, यानंतर नाशिकमध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज्यात 13 आमदार निवडून आलेत, यात नाशिक शहरातील 3 आमदार होते. यानंतर 2012 मध्ये राज ठाकरे यांच्या करिष्माच्या जादूने नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला. तब्बल 40 जागांसह सलग पाच वर्ष मनसेने नाशिक महानगरपालिकेवर सत्ता उपभोगली, मात्र 2017 च्या निवडणुकीत मोदींच्या लाटेमुळे अवघ्या पाच जागांवर मनसेला समाधान मानावे लागले.

राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम:सुरुवातीपासून राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे. मनसेच्या सत्ता काळात नाशिकचा विकास झालाय, त्यात वाहत्या पाण्यावरील शंभर फुटी कारंजा, बोटॅनिकल गार्डन, होळकर पुलावरील वॉटर कर्टन, शहरातील रिंग रोड यांसारखी अनेक कामे झालीत. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या निधीचा महापालिकेवर भार पडू न देता सीएसआर निधीतून ही कामे राज ठाकरे यांनी केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती
  2. ...अन् माझ्या पोटात गोळाच आला, उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

ABOUT THE AUTHOR

...view details