नाशिक Raj Thackeray:नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. सुरुवातीला राज ठाकरे यांनी श्री काळारामाचं दर्शन घेत पूजा, आरती केली. यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा केली. आज नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा 18 वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करतील असं सर्वांनाच वाटत असताना लोकसभा निवडणुकीबाबत लवकर निर्णय घेऊ असं राज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मनसैनिक काहीसे नाराज झाले.
मनसैनिकांना सत्ता मिळवून देणार :"भाजपा, शिवसेना सारख्या पक्षानं अनेक वर्ष कार्य केल्यानंतर त्यांना आज सत्ता उपभोगायला मिळत आहे. त्यामुळे मनसैनिकांनीसुद्धा संयम ठेवावा. तुम्हाला सत्ता दिल्याशिवाय मी राहणार नाही, असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. पक्ष स्थापनेपासून 18 वर्ष मी अनेक चढ कमी उतार जास्त पाहिले. असं असलं तरी मी तुम्हाला यश मिळवून देणार म्हणजे देणार असं ठाकरे यांनी म्हटलं. सोशल मीडिया एक मोठं माध्यम आहे. प्रत्येकाने त्याचा योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे. याबाबत शहरात कार्यशाळा घेणार असल्याचं", राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितलं.
मनसेने सर्व आंदोलन यशस्वी केले :"मला माझ्या कडेवर मला माझी पोर खेळवायची आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर खेळवली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 18 वर्षांत सर्वाधिक आंदोलन केलेत आणि ते पूर्ण देखील केलेत. आम्ही आंदोलन करतो आणि शेवट पण करतो. रस्ते व्यवस्थित नाही आणि टोल वसुली केली जात आहे. आम्ही आंदोलन करून 65 टोलनाके बंद केली. भोंगे आंदोलनात माझ्या पोरांवर 17 हजार केसेस टाकल्या. मुंबई मधील समुद्रात होत असलेली अनधिकृत दर्गा पाडण्यास भाग पाडले. एकदा सरकार माझ्या हातात द्या, हे सगळे भोंगे सरसकट बंद करू दाखवतो. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झाले नाही? पंतप्रधान आले आणि फुलं वाहून गेले. याचं उत्तर सरकारकडे नाही", असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
गड किल्ल्यांकडे लक्ष द्या :"महाराजांचे गडकिल्ले व्यवस्थित करा. तो आपला इतिहास आहे. पुतळे बघून काय करणार? समुद्रात पुतळा उभा राहू शकत नाही. वर्धापन दिनी आपण शपथ घेऊ. महाराष्ट्रासाठी जे चांगलं असेल ते आपण करू. जातीपाती शिवाय महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. मला माझ्या पक्षात जातीपाती नको. लोकसभा निवडणूक बाबत लवकर निर्णय जाहीर करू", असंही राज ठाकरे यांनी बोलताना म्हटलं.
हेही वाचा :
- नागपूर-पुण्याचं अंतर 'इतक्या' तासात होणार पूर्ण; छत्रपती संभाजीनगर-पुणे सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या
- अंधश्रद्धेला 'मूठमाती' ! 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा
- पोहायला गेलेले तीन मित्र नदीत गेले वाहून, एनडीआरएफ पथकाद्वारे शोधमोहीम सुरू