मुंबई Chhagan Bhujbal Warns Officer : नाशिक महामार्गाची मोठी दुरवस्था झाली असून ठीकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले. त्यामुळे नाशिक मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ तसेच रस्ते प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही, तोपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वाहतूक पुढील 10 दिवसात सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्याला निलंबित करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्गाची दुरवस्था :मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील 10 दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना आज दिले. मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
तोपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावर टोल वसुली करू नये :मुंबई नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा आणि प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही 8 ते 10 तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाश्यांना दुप्पटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. तसेच त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणं आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते. मात्र, या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.