नागपूर Dolly Chaiwala : आपल्या देशात गेल्या काही वर्षात चहा आणि चायवाला दोन्ही शब्द अधूनमधून कानी पडत असतात. अशातच नागपूरचा प्रसिद्ध चायवाला डॉलीची क्रेज सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉलीच्या चहाची चव जितकी न्यारी आहे, त्यापेक्षा तो ज्या प्रकारे चहा देतो तो अंदाज मात्र जगावेगळा आहे. डॉली म्हणजे नागपूरचा सेलिब्रिटी. त्याच्या फॅन लिस्ट मध्ये शेकडो नावं आहेत. आता यात एक नवीन नाव समाविष्ट झालय. ते म्हणजे प्रसिद्ध बिल गेट्स यांचं. डॉली आणि बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिल गेट्स यांनी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केल्यानं आज डॉली पुन्हा प्रकाशझोतात आलाय.
10 वर्षांपासून विकतो चहा : डॉलीचं खरं नाव सुनील मारोती पाटील असं आहे. मात्र, तो त्याच्या स्टाईलमुळे डॉली नावानं प्रसिद्ध आहे. सदर भागातील ओल्ड व्हीसीए मैदानाजवळ तो चहा विकतो. 'डॉली की टपरी' या नावानं त्याची चहाची टपरी संपूर्ण देशभर प्रसिद्ध झालीय. 29 वर्षीय डॉली गेल्या 10 वर्षांपासून चहा विकतोय. डॉली नेहमीच कॅप्टन जॅक स्पॅरोच्या लूकमध्ये दिसतो त्याची स्टाइल ग्राहकांना नेहमीचं आकर्षित करत आलीय.