मुंबई Narayan Surve News :अक्षरांवर प्रेम करणारी पिढी आता संपण्याच्या मार्गावर आहे. आता पुस्तकं लोकांची जीव की प्राण नसतात. त्यांची जागा आधुनिक तंंत्रज्ञानाने घेतली आहे. अशी विधानं आपल्याला वरचेवर ऐकायला मिळत असतात. पण वास्तव वेगळं आहे. पुस्तकांची ताकद कुणाचंही मतपरिवर्तन घडवून आणू शकते. अगदी शर्विलकाचं म्हणजे ज्याला साध्यासोप्या भाषेत चोर म्हणतात त्याचीही! दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या लेखणीच्या ताकदीचा प्रत्यय त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे चौदा वर्षांनंतर पुन्हा एकदा आला. अगदी अलीकडचीच घटना. आपल्या कवितांमधून शोषित, वंचित तसंच कष्टकरी वर्गाच्या वेदना मांडणारे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या घरी एका चोरानं चोरी केली. पण, या चोराला उपरती झाली. त्यानं चोरी केलेलं सर्व सामान परत केलं. सर्व मुद्देमालासह त्या साहित्यप्रेमी चोरानं आपली भावनिक मनोवस्था शब्दात मांडली आणि ती चिठ्ठी तिथे ठेऊन तो निघून गेला. हे घर नारायण सुर्वे यांचं आहे हे आपल्याला ठाऊक नव्हतं. अशा शब्दांत त्यानं स्वतःच्या मनातली बोच कबूल केली आणि सुर्वे यांच्या घरी चोरी केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडे माफीची याचना केली. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांची मुलगी आणि जावई रविवारी (14 जुलै) घरी आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्यासमोर चिठ्ठीतून उलगडला.
नेमकं काय घडलं? : नेरळ येथील गंगानगर परिसरात दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांचं घर आहे. सध्या या घरात त्यांची मुलगी सुजाता घारे आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्यानं सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. काही दिवसांसाठी घारे दाम्पत्य आपल्या मुलाकडं विरार येथे गेले होते. घर बंद असल्याचं बघून एका शर्विलकाने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे त्यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, आयुष्यभर वंचितांची कड घेणाऱ्या कवीच्या लेकीच्या घरात त्याला कोणतेही दागिने आणि पैसे मिळाले नाहीत. त्यामुळं चोरानं घरातील तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी, टीव्हीची चोरी केली. सलग दोन ते तीन दिवस त्यानं घरातील साहित्यावर डल्ला मारला.
चोरानं पत्रात काय म्हटलंय? :हे घर नारायण सुर्वे यांचं असल्याचं लक्षात आल्यानंतर चोराला उपरती झाली. त्यानं सर्व सामान परत केलं. तसंच यावेळी त्यानं एक भावनिक चिठ्ठीही लिहून ठेवली. चिठ्ठीत तो म्हणालाय, "मला माहिती नव्हतं की, हे नारायण सुर्वेंचे घर आहे. अन्यथा मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, तुमची जी वस्तू घेतलीय. ती मी परत करतोय. मी टीव्हीपण नेला होता. परंतु आणून ठेवला. सॉरी..." असं चोरानं आपल्या चिठ्ठीत म्हटलंय. ज्याने हे केलं तो चोर, हे खरंच. मात्र त्याला नारायण सुर्वे ठाऊक आहेत, हे महत्त्वाचं. 'भाकरीच्या चंद्रा...'ची काळजी करणारे दिवंगत नारायण सुर्वे त्या चोराला आपलेसे वाटतात. कोण जाणो? भविष्यात आपल्या 'भाकरीचा चंद्र...' शोधण्यासाठी तो चौर्यकर्म सोडेल आणि प्रामाणिकपणे काम करुन उदरनिर्वाह करेल.
"आज माझ्या कोरड्या शब्दात