मुंबईMarathi Film Festival In USA:मराठी चित्रपटाचे विषय वैविध्यामुळे चर्चेत असतात. मराठीमध्ये संहितेत अनेक प्रयोग होताना दिसतात. त्यामुळे अनेक मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये उत्तम कामगिरी करताना दिसतात. बऱ्याच मराठी चित्रपटांना अवॉर्ड्ससुद्धा मिळतात. खरंतर इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोहोचणं ही गोष्ट निर्माता-दिग्दर्शकासाठी अभिमानास्पद गोष्ट असते. आता उत्कृष्ट मराठी चित्रपटांचा खजिना एकत्रितपणे विदेशी रसिकांना पाहता येणार आहे. निमित्त आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतामध्ये होऊ घातलेला मराठी चित्रपट महोत्सव. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्यावतीने या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलय. त्यामुळे आता केवळ मराठी चित्रपटच नाही तर मराठी चित्रपट महोत्सवही साता समुद्रापार पोहोचला आहे.
3 शॉर्टफिल्मचे प्रीमिअर होणार :अमेरिकास्थित मराठी निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या NAFA (North American Film Association) मार्फत हा भव्य सोहळा दिमाखात पार पडणार असून NAFA निर्मित ३ शॉर्टफिल्म्सचे ("निर्माल्य", "अथांग" आणि "पायरव") या महोत्सवात प्रीमिअर होणार आहेत. या शॉर्टफिल्मची निर्मिती, चित्रीकरण अमेरिकेतच झालेलं असून कलाकारही स्थानिकच आहेत. अशा प्रकारचा फिल्म उत्सव अमेरिकेत होणारा पहिलाच प्रयत्न असून यापुढेही अशा फिल्म फेस्टिवल्सचे आयोजन सुरूच राहणार आहे. या चित्रपट महोत्सवाला अनेक प्रथितयश आणि दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून, महोत्सवादरम्यान इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.