पुणे Manorama Khedkar Arrested:वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड इथून अटक केलं आहे. मनोरमा खेडकर या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील पार्वती निवास या घरगुती लॉजिंगमध्ये लपून बसल्या होत्या. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी पहाटे 2 वाजता पार्वती निवास इथं छापा घालून त्यांना अटक केली. मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर पिस्तूल बाहेर काढलं होतं.
पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांसह अन्य लोकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं पाचाड येथील एका घरगुती लॉजिंगमधून ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी नऊ वाजता महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील माहिती पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून देण्यात आली. - शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड
मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी : पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक केली. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून मनोरमा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. अखेर मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
महाडमधील पाचाडच्या घरगुती लॉजिंगमधून पहाटे केली अटक :मनोरमा खेडकर यांना रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील पार्वती निवास या घरगुती लॉजिंगमधून पहाटे साडेसहाच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केली. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास मनोरमा खेडकर या पार्वती निवास इथं राहायला आल्या, अशी नोंद लॉजिंगच्या रजिस्ट्ररमध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर पहाटे 2 च्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक पाचाड इथं दाखल झालं. पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगत पाचाड इथल्या हिरकणी वाडी इथून पार्वती निवास या घरगुती लॉजिंगमधून मनोरमा खेडकर यांना अटक केली. "पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांसह अन्य लोकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं पाचाड येथील एका घरगुती लॉजिंगमधून ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी नऊ वाजता महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील माहिती पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून देण्यात आली," अशी माहिती महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.