पुणे :हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीतील सगळे अंदाज फोल ठरवत भाजपानं मोठी मुसंडी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोचपावती तिथल्या जनतेनं दिली आहे. तिथं देखील डबल इंजिन सरकार होतं. जनतेनं त्यांना साथ दिली आहे. आता महाराष्ट्रात देखील हरियाणाची पुनरावृत्ती होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चंदीगड इथल्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याकडं जाताना पुणे विमानतळावर बोलत होते.
कल्याणकारी योजनेची पोचपावती जनता देणार :एकीकडं राज्यात महाविकास आघाडीनं प्रकल्प बंद केले होते, ते आम्ही सुरू केले आहेत. राज्यात नवीन उद्योग आणून कल्याणकारी योजना देखील राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजनेपासून ते अनेक योजना महायुतीच्या माध्यमातून राबवण्यात आल्या. याची पोचपावती येत्या निवडणुकीत जनता आम्हाला नक्कीच देणार आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हरियाणा निकालानं सगळे एक्झिट पोल फेल ठरवले :चंदीगड इथं हरियाणाचे मुख्यमंत्री नायब लिंह सैनी यांचा शपथविधी कार्यक्रम होता. या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, अतिशय चांगला आणि मोठा उत्साह पाहायला मिळाला. हरियाणाचे निकाल आपण जर पाहिले तर या निकालानं सर्वच सर्व्हे आणि एक्झिट पोल फेल ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोचपावती तिथल्या जनतेनं दिली आहे. पुन्हा नायब सिंह सैनी हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला जायची संधी मिळाली याचा आनंद आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.