मुंबई Maharashtra Assembly Election :आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. महायुती सोबत महाविकास आघाडीच्या बैठकांना जोर आलाय. ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी करत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा बैठक घेतली. यात आगामी विधानसाभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आलीय असं सांगितलं जातय.
तीनही नेत्यांच्या सभांचे आयोजन : मागील विधानसभा निवडणुकीत झालेला घोळ तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर वर्चस्वासाठी आणि सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी महायुतीकडून विधानसभा निवडणुकीचा प्लॅन तयार झाल्याचं समोर येत आहे. तिन्ही पक्षाकडून नेत्यांच्याही जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. तसंच महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद कोल्हापूर महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन 20 ऑगस्ट रोजी जाहीर सभेनं सुरू होणार आहे.
महायुतीतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभा, सामूहिक सभा, मेळावे, संवाद आणि रॅलीचं देखील आयोजन केलं जाणार आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ आणि 7 विभागात एकाच दिवशी विभागनिहाय महायुतीतील सर्व घटक पक्ष संवाद, लाभार्थी यात्रा आणि सभा आयोजित करतील तसंच विभागवार ७ विभागात उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होतील.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोन दिवसापासून दिल्ली दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडं महायुतीच्या भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपला विधानसभा निवडणुकीचा प्लॅन तयार केला आहे.
हेही वाचा
- महायुतीला पराभवाची धास्ती? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात योजना आणि मदतीची खैरात - Maharashtra Government schemes News
-
आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत- अजित पवार - Jan Sanman Yatra In Nashik