महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना शिंदे पक्षात नेमकं चाललंय काय? अनेक नेते नाराज, 'हे' नेते ठरतायत एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी - Eknath shinde Shivsena - EKNATH SHINDE SHIVSENA

Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे पक्षातील काही नेते नाराज आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेत कोणते नेते नाराज आहेत? कशामुळे नाराजी आहे? हे जाणून घेऊ.

Eknath shinde
एकनाथ शिंदें (Source - Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 7:47 PM IST

मुंबई Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडाला जून 2024 मध्ये दोन वर्षे झाली आहेत. पक्ष नवीन असला तरी नेते मात्र अनुभवी आहेत. परंतु या दोन वर्षात पक्षांतर्गतच नेत्यांमध्ये धुसफूस आणि नाराजी अनेकदा समोर आली. लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. तर तिकीट न मिळाल्यामुळं माजी खासदार आनंदराव अडसूळांनी नाराजी व्यक्त केली होता. तसेच तिकीट नाकारल्यानं भावना गवळी, कृपाल तुमाने यांचीही पक्षात घालमेल सुरू होती. आता विधानसभा निवडणुकीला पक्षांतर्गतच काही नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यपाल पदावरुन अडसूळांची नाराजी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना लोकसभा निवडणुकीत तिकिट देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं तेव्हा आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता दोन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. "राज्यपाल पदासाठी वडिलांना शब्द दिला होता. पण राज्यपालांच्या यादीत आमचं नाव का नाही?," असा सवाल आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित करत पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच पक्ष आणि महायुतीनं आमच्यावर अन्याय केल्याचं अभिजीत अडसूळ यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. "मला राज्यपाल पद न दिल्यामुळं मी नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडे सुरू आहेत. मी नाराज आहे हे खरं आहे. महायुती आणि पक्षानं याची दखल घ्यावी," असं आनंदराव अडसूळ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

रामदास कदम नाराज ? : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं (शिंदे गट) गेल्या आठवड्यात निरीक्षकांची आणि प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र 100 पेक्षा अधिक निरीक्षकांच्या यादीत माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा समावेश नसल्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या मुलाला तिकीट मिळावं, असा आग्रह रामदास कदम यांनी पक्षाकडे धरला होता. तर गजानन कीर्तिकर हे पक्षविरोधी काम करतात, असा आरोप करण्यात आला. ते युतीधर्म न पाळता स्वत:च्या मुलाला मदत करतात, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे गजानन कीर्तिकरांना तिकीट नाकारण्यात यावं. नाहीतर आपण पक्षासाठी प्रचार आणि काम करणार नाही, अशी भूमिका रामदास कदम यांनी घेतली होती. आता निरीक्षकांच्या यादीतूनच रामदास कदम यांना पक्षानं डावलण्याच आलंय. यादीत नावाचा समावेश नसल्यामुळं रामदास कदमही नाराज झाले आहेत.

प्रवक्त्यांची संख्या जास्त : एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गटातून) आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. विविध पक्षातील कार्यकर्ते शिंदे गटात अजूनही प्रवेश करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील मूळ कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची नाराजी वाढलीय. शिंदे गटात काँग्रेसमधून आलेल्यांची प्रवक्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. राजू वाघमारे, अरुण सावंत आणि ज्योती वाघमारे हे प्रवक्ते शिंदे गटात आलेत. त्यामुळं मूळ शिवसेनेतील प्रवक्ते सध्या कुठेही चर्चेत किंवा माध्यमांमध्ये बोलताना दिसत नाहीत. शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातदेखील प्रवक्त्यांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे महिला आघाडीत इतर पक्षातून आलेल्या महिलांना पदाधिकारी करण्यात आलं आहे. त्यामुळं मूळ शिवसेनेतील महिला आघाडीतील महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. ही वाढती नाराजी एकनाथ शिंदे यांची विधानसभा निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरणार का? असा प्रश्न यानिमित्तानं विचारला जात आहे.

एकनाथ शिंदेंसोबत 'डील' :राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले "लोकसभा निवडणुकीत भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यावेळी हे दोन्ही नेते नाराज झाले होते. परंतु एकनाथ शिंदें यांनी त्यांच्याशी 'डील' केलं होतं. आश्वासनानुसार मुख्यमंत्र्यांनी दोघांचीही विधान परिषदेवर वर्णी लावली. थोडक्यात काय तर जसं एकनाथ शिंदे भाजपासोबत डील करतात तसंच त्यांच्या पक्षातील पदाधिकारी, नेते सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत 'डील' करतात. जर कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेतलं नसतं, तर कदाचित त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता. त्यामुळं शिंदे गटात पक्षांतर्गतच मोठी नाराजी आहे."

विधानसभा निवडणुकीत नाराजी वाढण्याची शक्यता-"जर नाराजींची संख्या वाढली तर त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं दारं खुलं आहे. याची चांगली जाण एकनाथ शिंदेंना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे सावध भूमिका घेत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी तिकिटावरून नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही नाराजी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी ठरू शकते." असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

  1. बॅनरवरील धनुष्यबाण चिन्ह फाडल्यानं शिंदे गट आणि उबाठा गटात राडा : 'बॅनर फाडताना रंगेहात पकडलं' - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
  2. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ : 'सह्याद्री'बाहेर घोषणाबाजी, वाचा काय आहे कारण? - Koli community meeting
  3. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - CM Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details