मुंबई :एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या बंडात साथ देणारे राज्याचे विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत राज्याचे विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी राज्यात आणखी एक 'उदय' होणार असल्याचं वक्तव्य केलं. एक उदय दोन दगडांवर हात ठेवून आहे, त्याचा 'उदय' होण्याची शक्यता आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. उबाठा खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सामंत यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
उदय सामंतांसोबत 20 आमदार, संजय राऊतांचा दावा :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कुणालाही सोडत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदय सामंतांना दावोसला घेऊन गेले आहेत. उदय सामंतांसोबत शिवसेनेचे 20 आमदार आहेत, अशी आपली माहिती आहे. सत्ता स्थापन होताना एकनाथ शिंदे रुसले, तेव्हाच 'उदय' होणार होता. मात्र शिंदे सावध झाले, असा गौप्यस्फोट शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला. फोडाफोडी हेच भाजपाचं राजकारण आहे, ते आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्षदेखील फोडतील, असं मतही संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
विजय वडेट्टीवार बोलले ते वर्षभरापासून सुरु आहे - सुषमा अंधारे : विजय वडेट्टीवार बोलले ते वर्षभरापासून सुरु आहे. उदय सामंत कोणत्याच पक्षाचे नाहीत. त्यांना भाजपाकडं जाणं फार मोठी गोष्ट नाही. एकनाथ शिंदे वेगवेगळे दबावतंत्र वापरत आहेत, मात्र त्या दबावतंत्राचा फारसा वापर होत नसल्याचं दिसत आहे. भाजपा त्यांना खिजगणतीत देखील धरत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. विजय वडेट्टीवारांच्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे. एकीकडं एकनाथ शिंदे भाजपापासून दूर दूर जात आहेत. त्याचवेळी उदय सामंत त्यांचा कंपू तयार करत आहेत, असं चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेना जे जमलं तितके आमदार उदय सामंत स्वतःसोबत जोडू शकतील का, हा प्रश्न आहे. उदय सामंतांची केवळ देवेंद्र फडणवीसांशी नव्हे, तर एकाच वेळी सर्व नेत्यांबरोबर मित्र म्हणून नातेसंबंध जपत आहेत. एकनाथ शिंदेंनी बेईमानी करुन मुख्यमंत्री पद मिळवलं. त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. त्यांनी जे केलं ते परत त्यांच्या वाट्याला येत आहे. कर्मा रिटर्न्स असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यामुळे शिंदेंना त्यांच्यासोबत गद्दारी झाल्याचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे, खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
वडेट्टीवार, राऊतांच्या टीकेला काडीचीही किंमत नाही - अरुण सावंत :महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला दूर फेकून दिलं आहे. त्यांची कार्यपद्धती आवडली नसल्यानं त्यांना सत्ता दिली नाही. विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांच्याकडं बोलायला काही विषय नसतो. त्यामुळे काहीतरी स्फोटक बोललो तर आपल्याकडं लक्ष वळेल, यासाठी अशा प्रकारे आरोप केले जात आहेत. सुषमा अंधारेंना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. वडेट्टीवार आणि राऊत काहीतरी पिल्लू सोडून देतात. हे बेछूट आणि खोटे आरोप आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी व्यक्त केली. आम्ही त्यांच्या आरोपांना काडीचीही किंमत देत नाही. उदय एकाच बाजूनं होतो तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं होत आहे. एकनाथ शिंदे हे वादळ आहे. ते काही काळासाठी शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्यांचे वादळ आल्यावर उरली सुरली उबाठा शिवसेना आणि काँग्रेस भुईसपाट होणार आहे. मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे महायुतीच्या नेतृत्वाला संधी देणार आहेत. जनता मविआ नेत्यांच्या नेहमीच्या आरोपांना कंटाळली. मंत्री राहिलेल्या वडेट्टीवारांना अद्याप काय बोलावं आणि कसं बोलावं हे कळत नाही, हे दुर्दैव आहे, असं सावंत म्हणाले.
कसा आहे उदय सामंत यांचा राजकीय प्रवास ? : उदय सामंत यांनी त्यांच्या सक्रिय राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम सुरु केलं. 2004 मध्ये ते पहिल्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तत्कालिन भाजपाचे आमदार बाळ माने यांचा पराभव करत विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना नगरविकास राज्यमंत्री पद दिलं. 2004 आणि 2009 ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवली आणि ते विजयी झाले. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग करत शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार झाले. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना म्हाडाचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री केलं. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली. उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडं जाणाऱ्या शेवटच्या फळीत त्यांचा समावेश होता. तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ते गुवाहाटीला गेल्याचं तेव्हा समोर आलं. सामंत यांची फडणवीसांसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात होती, आता वडेट्टीवार, राऊत यांनी त्याबाबत थेट माहिती दिली आहे.
हेही वाचा :
- भाजपात येण्यासाठी वडेट्टीवार कितीदा फडणवीसांना भेटले, मला माहितीय; उदय सामंत यांचा पलटवार
- "कॅबिनेटमध्ये आता मारामाऱ्या अन् खून होणेच बाकी"; संजय राऊत म्हणतात, "आम्ही संपलो म्हणणारे काँग्रेस नेते तुम्ही..."
- 'त्या' नगरसेवकांनी आम्हाला सल्ला देऊ नये; भाजपामध्ये गेल्यावर तिकीट मिळेल का हे पाहावे, मंत्री उदय सामंत कडाडले