सातारा - म्हसवडमध्ये वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणातून विषबाधा झाली. सुमारे दीडशे जणांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने म्हसवड येथील शासकीय रुग्णालय तसेच चार खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना विषबाधा झाल्याने म्हसवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड येथे सोमवार, दि १० जून रोजी घराच्या वास्तुशांतीचे जेवण होते. जेवल्यानंतर सुमारे १०० ते १५० लोकांना विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांना त्रास झाल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली.
वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही वेळानंतर बऱ्याच लोकांना तसाच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी म्हसवडमधील चारही खाजगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती.
खासगी रूग्णालयात जागा कमी पडू लागल्याने काही रुग्णांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी दवाखान्यात देखील बाधित रुग्णांनी उपचार घेतले. याबाबत माण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.
विषबाधेच्या घटनेनंतर माणचे तहसीलदार विकास अहिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, म्हसवडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी रूग्णालयात जावून रुग्णांची चौकशी केली. तसेच घटनास्थळाची पाहणी करून अन्नाचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.