महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी; बंडखोरी वाढण्याची चिन्हे - MAHARASHTRA ELECTION 2024

इतर छोटे पक्षदेखील तिसरी आघाडी करून किंवा स्वतंत्रपणे लढणार असल्याने उमेदवारीच्या रिंगणात यावेळी मोठी भाऊगर्दी असेल, अशी दाट शक्यता आहे.

maharashtra vidhansabha election
विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2024, 7:44 PM IST

मुंबई :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच राज्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग आलाय. विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणूक लढवून आमदार होण्याची इच्छा आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष सहभागी असल्याने इच्छुकांना त्यांच्या इच्छेनुसार पक्षांतून अधिकृत उमेदवारी देतानाही पक्षांना अडचणी येतात. अशातच नाराज झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारीसाठी बंडखोरी करतात. त्यामुळे राजकीय पक्षांसमोर इच्छुक उमेदवारांची ही बंडखोरी थोपवण्याचं मोठे आव्हान उभं ठाकणार आहे. तसेच इतर छोटे पक्षदेखील तिसरी आघाडी करून किंवा स्वतंत्रपणे लढणार असल्याने उमेदवारीच्या रिंगणात यावेळी मोठी भाऊगर्दी असेल, अशी दाट शक्यता आहे.


महाशक्ती परिवर्तन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात : महायुती आणि महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार त्यावरूनच बंडखोरी होणार आहे. त्यामुळेच राज्यात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढलंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती, महाविकास आघाडी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंचा मनसे स्वबळावर लढणार आहेत. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष यांची यापूर्वी घोषणा झालेली महाशक्ती परिवर्तन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहे. माजी मंत्री आणि निवडणूक जाहीर झाल्यावर महायुतीबाहेर पडलेले माजी मंत्री महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षसुद्धा आता स्वबळावर लढणार आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आणि एमआयएमसुद्धा निवडणुकीत उमेदवार उतरवणार असल्याने यावेळची निवडणूक अधिकच रंगतदार अन् टोकदार होण्याची शक्यता आहे.

बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी:महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. तर महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील या तीन पक्षांपैकी एकाच पक्षाला मतदारसंघ सुटेल व त्याद्वारे एकाच उमेदवाराला अधिकृत उमेदवारी मिळणार असल्याने ज्या पक्षांसाठी मतदारसंघ सुटणार नाही त्या पक्षांतील इच्छुक उमेदवारांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. अनेक इच्छुकांनी अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करून निवडणुकीची रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उमेदवारीच्या मुद्द्यावरुन बंडखोरी होण्याची शक्यता आहे.


मतविभागणीमुळे हरियाणा पॅटर्नची शक्यता : या निवडणुकीत बंडखोरीचं प्रमाण वाढणार हे निश्चित असले तरी उमेदवारांना मिळणाऱ्या संधीतदेखील वाढ होईल, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वीपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना राजकारणात झळकण्याची आवड पूर्ण करून घेता येईल. मते खाण्याचे प्रकार वाढीस लागतील आणि त्या माध्यमातून उमेदवारांना आर्थिक लाभ होण्याची शक्यतादेखील वाढेल. रासपच्या महादेव जानकरांना निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांच्यासोबत अन्याय झाल्याचा साक्षात्कार कसा झाला, महाविकास आघाडी प्रबळ असेल तिथे जानकरांचे उमेदवार उभे राहतील. मनसेतर्फे एके ठिकाणी स्वबळावर लढण्याची घोषणा केली जातेय, तर दुसरीकडे काही जागांवर समझोता करण्याचं सांगितलं जातंय, मनसे भाजपाची बी टीम असल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

ABOUT THE AUTHOR

...view details