मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा मुंबईतील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा पत्र X सोशल मीडिया हँडलवर शेअर केलं होतं आणि आता त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यात त्यांनी सांगितले की, मी 44 वर्षे काँग्रेसमध्ये असून पक्षाची सेवा केली, मात्र माझा सन्मान करण्यात आला नाही. त्यामुळे आता मी राजीनामा जाहीर केलाय, असंही ते म्हणालेत. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय.
रवी राजा काँग्रेस पक्षावर नाराज :रवी राजा हे काँग्रेस पक्षावर नाराज असल्यामुळेच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं बोललं जातंय. रवी राजा यांनी काँग्रेसकडून सायन-कोळीवाड्यातून तिकिटाची मागणी केली होती, मात्र या जागेवरून काँग्रेसने गणेश यादव यांना तिकीट दिले. तर त्याच्या बाजूच्याच धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे रवी राजा काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं मानलं जातंय. कारण त्यांनी या जागेवर तिकिटाची मागणी केली होती. ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेसमध्ये असलेले मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलंय. विधानसभा निवडणुकीत सायन कोळीवाडा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास रवी राजा इच्छुक होते. परंतु काँग्रेसने येथून गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने रवी राजा यांनी नाराज होऊन काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. सायन कोळीवाड्याचे तिकीट काँग्रेस नेत्यांकडून विकलं गेल्याचा आरोपही रवी राजा यांनी केलाय. रवी राजा १९९२ पासून मुंबई महनगरपालिकेत नगरसेवक आहेत. तसेच २०१७ पासून सलग पाच वर्षे त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवलंय. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी मुंबईत केलेली अनेक आंदोलने चर्चेचा विषय ठरली आहेत. एकंदरीत रवी राजा हा मुंबईतील काँग्रेसचा सक्रिय आणि जमिनीवर उतरून काम करणारा अभ्यासू कार्यकर्ता होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राजा यांचा भाजपा प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय.
रवी राजा मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष- शेलार :रवी राजा हे आमचे फार जुने मित्र आहेत. मुंबई काँग्रेसचे प्रचंड अभ्यासू नेतृत्व म्हणून रवी राजांकडे पाहिलं जातं. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्षपद जाहीर करतो, असं म्हणत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी रवी राजा यांना मुंबई भाजपाचे उपाध्यक्षपद देत असल्याचं सांगितलंय.