महायुतीचे मंत्रिमंडळ आजच्या बैठकीतून निश्चित होणार; तिन्ही पक्षांतील मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय?
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर आज (गुरुवारी) मुंबईत मंत्रिमंडळात विस्तारावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
Published : 4 hours ago
मुंबई - महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीत मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यामुळे आणि कोणाला किती मंत्रिपद द्यायची? कुठली खाती द्यायची? यावरून एकमत होत नसल्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय. दरम्यान, महायुतीच्या आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अखेर मंत्रिमंडळ विस्तारातील गोंधळावर तोडगा निघू शकतो. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर ठाम आहेत. पण भाजपा हे खाते सोडण्याच्या तयारी दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेला शांत करण्यासाठी शिंदे यांच्या पक्षाला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरविकास (UD) खात्यांची ऑफर दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर आज (गुरुवारी) मुंबईत मंत्रिमंडळात विस्तारावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार यावर शिक्कामोर्तब होणार असून, त्याआधीच मंत्रिमंडळाच्या तिन्ही पक्षातील मंत्रिपदाचा फॉर्म्युलादेखील निश्चित झाल्याचं बोललं जातंय.
बैठकीत शिक्कामोर्तब होणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे मंत्रिपदावरून शिंदे नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर आज तिन्ही पक्षाची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुंबईत बैठक होणार असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं द्यायची? यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. खरं तर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आधीच तयार झालाय. पण आज बैठकीत केवळ औपचारिकता पूर्ण केली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशनाला अवघे तीन दिवस बाकी असताना मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांची शपथविधी हे अधिवेशन अगोदर घेण्याचं आव्हान महायुतीसमोर असल्याने आज कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीला निर्णय घेणे गरजेचे आहे.
महायुतीतील मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला काय? :बुधवारी एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारासह अन्य विषयांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. महायुतीतील मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार असून, मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार आहे. यात सर्वाधिक भाजपाचे मंत्री घेणार शपथ आहेत. भाजपाला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार आहेत. तर उर्वरित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार आहेत. "23 -12 -9 चा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय," भाजपाला 23 मंत्रिपदं मिळणार आहेत, तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 मंत्रिपदं मिळण्याचा फॉर्म्युला तयार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
गृहमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे नाराज? : एकीकडे आज महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार यावर आजच्या बैठकीतून अंतिम निर्णय होत असताना दुसरीकडे मात्र महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या पक्षाला गृहमंत्रिपद हवे आहे आणि या पदावर ते ठाम आहेत. तसेच शिंदे बुधवारी दिल्लीला न गेल्यामुळे उलटसुलट चर्चा असून, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं होतं की, "मागील सरकारच्या वेळी जर उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद हे भाजपाकडे होते, तर स्वाभाविकपणे आणि नैसर्गिकरीत्या ते यावेळेला गृहमंत्रिपद आमच्याकडे आले पाहिजे," असं संजय शिरसाट म्हणाले होते. तर 23-12-9 हा मंत्रिपदाचा फॉर्म्युला महायुतीत तयार आहे का? असा प्रश्न शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी विचारला असता, "आता मंत्रिपदं कोणाला किती द्यायची? हे दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. पण या फॉर्मुल्याची बातमी माध्यमाकडूनच मी ऐकली आहे, अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना माजी मंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी दिलीय.
गृहमंत्रिपद हे महत्त्वाचे खाते : दुसरीकडे महायुतीत एकनाथ शिंदे कदापि नाराज नाहीत, तसेच गृहमंत्रिपदाची आमची मागणी आहे, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय. पण गृहमंत्रिपदावरून शिवसेना दावा करत असताना गृहमंत्रिपद कोणाकडे जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, "गृहमंत्रिपदावरून शिवसेनेने कितीही भाजपावर दबाव आणला किंवा दावा केला तरी त्यांच्याकडे भाजपा गृहमंत्रिपद देणार नाही. कारण गृहमंत्रिपद हे महत्त्वाचे खाते आहे. भाजपाने रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून फोन टॅपिंग प्रकरण घडवलं होतं, अशी कामं गृहखात्यामार्फतच करता येतात. त्यामुळे हे महत्त्वाचे खाते भाजपा शिवसेनेला कदापि देणार नाही, असं राजकीय विश्लेषण जयंत माईनकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :