मुंबई -15 व्या विधानसभेचे वरिष्ठ सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलीय. राज्यात मराठा आंदोलनाची धग चहूबाजूंनी पसरत असताना आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधत असताना मनोज जरांगे पाटलांशी दोन हात करण्याची हिंमत छगन भुजबळांनी दाखवली होती. अशा प्रसंगी भाजपानेही भुजबळांना साथ दिली होती. परंतु आता मंत्रिमंडळातील भुजबळांचा पत्ता कट करण्यात आल्याने भुजबळ प्रचंड नाराज झाले असून, त्यांच्या नाराजीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपालाही बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
भाजपाचा डीएनए ओबीसी :राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी 80 च्या दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषविलेली आहेत. अशा या महत्त्वाच्या नेत्याला मंत्रिमंडळातून वगळण्याचे धारिष्ट्य अजित पवार यांनी कसे दाखवले? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. वास्तविक छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून, ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अशा परिस्थितीत भाजपासाठीसुद्धा छगन भुजबळांची नाराजी त्रासदायक ठरू शकते. भाजपाचा डीएनए ओबीसी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं असताना ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा असलेले छगन भुजबळ यांची नाराजी येत्या काळात भाजपासाठी घातक ठरल्यास त्याचा फटका त्यांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो.
मुख्यमंत्र्यांनी कुठेही हस्तक्षेप केलेला नाही : छगन भुजबळ यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी प्रखर भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले असताना एकटे छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरले. आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका जोमाने रेटून धरली. आताही मंत्रिमंडळातून पत्ता कापल्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांनी कुठेही हस्तक्षेप केला नसल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय. यावरून भुजबळांचा पत्ता कापण्यात भाजपाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा कुठलाही हात नसल्याचं स्पष्ट होतंय. तर याचाच दुसरा अर्थ यासाठी सर्वस्वी अजित पवार हेच जबाबदार असल्याचंही स्पष्ट होतंय.