नागपूर : सोमवारपासून (16 डिसेंबर) नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. महायुती सरकारचं यावेळचं हे पहिलंचं मोठं अधिवेशन आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमदार आणि मंत्र्यांच्या निवासाची सोय रवी भवन, आमदार निवास आणि नाग भवनात करण्यात आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं परिसराला छावणीचं स्वरुप दिलं जात असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या मंत्र्यांसाठी रवी भवनातील 40 बंगले सज्ज झाले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे बंगले आधीचं सज्ज झाले आहेत.
नव्या मंत्र्यांना मिळणार बंगले : उद्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर लगेच बंगल्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. उद्या भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकूण 40 पेक्षा अधिक मंत्री शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मंत्री नवीन बंगल्यात शिफ्ट होणार आहेत.
महिला आमदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था : सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह विरोधीपक्षातील सर्व आमदारांची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आलेली आहे. महिला आमदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार निवासातील एक फ्लोर राखीव ठेवण्यात आला आहे.