मुंबई: विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात ईव्हीएममधील कथित घोटाळा, बेळगावमधील मराठीची मुस्कटदाबी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधीवर टाकलेला बहिष्कार यावरून वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.
Live Updates-
- महाविकास आघाडीतून समाजवादीचे आमदार अबू आझमी बाहेर पडले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे म्हणाले,"महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्यासारखं वागत आहे".
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून झाला आहे. सरकार सत्तेत कसे आले, हा जनतेच्या मनात प्रश्न आहे. सत्तेत आलेलं सरकार जनतेच्या मनातलं नाही. आमची मते चोरली गेली आहेत. ७६ लाख मते वाढली आहेत. आम्ही जनभावना लक्षात घेऊन काल शपथ घेतली नाही. आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरील लढाई लढणार आहोत. माझे मत हा माझा अधिकार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना एमएसपीचा कायदा नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं. यापूर्वी बेरोजगार आणि शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. ज्यांना मतदान केले, त्यांनाच मत जाते की नाही ही शंका असेल तर वैयक्तिक अधिकारावर आक्रमण आहे. मारकटवाडी गावात मतदान करत असताना लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी भावना आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगानं लक्ष दिले पाहिजे. गावागावात तशी मागणी करण्यासाठी ठराव होत आहेत. काँग्रेसचे काही नेते मारकटवाडीत जाऊन आले आहेत. त्याबाबत आपण सविस्तर माहिती राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना कळविली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची आज शेवटची मुदत आहे. विधानसभा अध्यक्ष बिनविरोध करणं ही आजवर परंपरा राहिली आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. विरोधी पक्षनेते निवड करण्यासाठी चर्चा झाली. ते सकारात्मक आहेत".
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतो. विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा सुरू आहे. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. महाविकास आघाडीला जनतेनं जागा दाखविली आहे. विरोधी पक्षाकडे आता कोणताही मुद्दा राहिलेला नाही. लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर विरोधकांनी आक्षेप घेतला नाही. आमच्या ८ ते १० जागा हजार दोन हजार मतदांनी हरलो आहे. आम्ही जास्त लढविल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार यांनी कमी जागा लढविल्या आहेत".
- ईव्हीएमला विरोध करणाऱ्या विकास आघाडीच्या नेत्यांच्या निषेधार्थ महायुतीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. गोपीचंद पडळकर, पाशा पटेल, सदाभाऊ खोत यांनी हे आंदोलन केले. 'लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या महाविकास आघाडीचा धिक्कार' असो मतदारांचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीचा धिक्कारअसो, देवेंद्र फडणवीस यांना विरोध करणाऱ्या शरद पवार यांचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दिल्या आहेत.
- विरोधी पक्ष नेते पद आणि विधानसभेचे उपाध्यक्ष पद ही दोन पदे विरोधकांना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी दिली.
- राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार असल्याची शक्यता आहे. बहुमतात असलेल्या महायुतीकडून भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाजी अर्ज भरला आहे. त्यांची निवड जवजवळ निश्चित मानली जात आहे.
- महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडं विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याएवढी विधानसभा सदस्यसंख्या नाही. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदाची महायुतीकडं आज मागणी होऊ शकते. महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव आणि इतर नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत.
- राष्ट्रवादीचे (एसपी) रोहित पवार आज आमदारकीची शपथ घेणार आहे. विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान आणि जय संविधान म्हणून आमदारकीची शपथ घेतली. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेत आहेत.
- विधानभवनाबाहेरून बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ईव्हीएमवर टीका करणाऱ्या विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, "लोकसभेत आमचा पराभव झाला. आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. आधी ईव्हीएमवर का आक्षेप घेतला नाही? ईव्हीएमवरून निवडून येणाऱ्या सर्व आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत. अपयश लपविण्याचे काम शरद पवार करत आहे. महाविकास आघाडीच्या खोटेपणाला जनतेनं नाकारले आहे. मारकटवाडीची जनता पवारांसोबत नाही".