मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यात मागील काही महिन्यांपासून रान पेटवलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केलीत. नवी मुंबईत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर विधिमंडळ सभागृहात विशेष अधिवेशन बोलावून त्यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याला मान्यता दिलीय. मात्र मराठा, कुणबीसह सरसकट मराठ्यांना मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून, निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते उपोषणाचं हत्यार उगारणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपली ताकद दाखवली, याचा फटका महायुतीला बसला. तर मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाला सोबत घेऊन आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. काही ठिकाणी आपण उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, सोमवारी (4 नोव्हेंबर) मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. पण अचानक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार का घेतली? याची कारणं काय आहेत? मनोज जरांगे निवडणूक न लढवतादेखील काही मतदारसंघात आपली ताकद दाखवू शकतात का? तसंच त्यांनी माघार घेतल्यामुळं याचा फायदा नक्की कोणाला? महाविकास आघाडीला की महायुतीला? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत. या सर्वांचं नेमकं कारणं काय? यावर एक नजर टाकू यात.
निवडणुकीत माघार घेण्याचं कारण काय? :मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. यामुळं ते बॅकफूटवरती गेले आहेत. त्यांनी अचानक आपली भूमिका बदलल्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. मराठा समाजाला जे आरक्षण देणार नाहीत, समाजाला जे न्याय देणार नाहीत, त्यांना आपण विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू, असं म्हणणारे मनोज जरांगे यांनी यू-टर्न का घेतला? याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. "मात्र एका जातीच्या मतावर लढणं शक्य होणार नाही, आपली ताकत कुठेतरी कमी पडेल आणि एका जातीच्या, एका समाजाच्या जीवावर उमेदवाराला मत मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत", असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. एका समाजाच्या किंवा जातीच्या जीवावर उमेदवारांना मतं मिळणार नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्याच मराठा समाजाने लाखोंच्यावर सभा त्यांनी घेतल्यात. मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतल्यामुळं मराठा समाज नाराज झाल्याचंही बोललं जातंय. कारण मराठा समाजाची निवडणुकीच्या माध्यमातून ताकद दाखवता आली असती, असं मराठा समाजातील काहींचं म्हणणं आहे.
खरं तर मतांमध्ये आपला समाज विभागला गेलाय आणि मराठा समाजानं राजकीय नेत्यांच्या नादाला न लागता किंवा त्यांच्याशी संबंध ठेवता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. मात्र मराठा समाजाचे अनेक नेते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच समाजही राजकीय नेत्यांशी संलग्न आहे. त्यामुळं कदाचित मनोज जरांगे यांना मतांचं विभाजन होईल आणि मराठा समाजातील उमेदवाराला अपेक्षित मतं मिळणार नाहीत ही भीती वाटली असावी, म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असल्याचं बोललं जातंय.