महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक प्रचारात सेलिब्रिटींनी का फिरवली पाठ? काय आहेत कारणे?

यावेळी काही सेलिब्रिटींचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी प्रचारात दिसणारे सेलिब्रिटी विधानसभा निवडणूक प्रचारात रस्त्यावर उतरताना दिसले नाहीत, याची अनेक कारणे असल्याचं बोललं जातंय.

celebrities in election campaign
निवडणूक प्रचारात सेलिब्रिटींची पाठ (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 6:29 PM IST

मुंबई -सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळं आता मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागलीय तसा प्रचार शिगेला पोहोचतोय. प्रचारासाठी केवळ चार ते पाच दिवस शिल्लक असताना अजूनही सेलिब्रिटी प्रचारात उतरल्याचं दिसत नाहीय. कुठलीही निवडणूक म्हटले की, मोठमोठे सेलिब्रिटी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी प्रचारात दिसणारे सेलिब्रिटी विधानसभा निवडणूक प्रचारात रस्त्यावर उतरताना दिसले नाहीत, याची अनेक कारणे असल्याचं बोललं जातंय.

'या' सेलिब्रिटींकडून प्रचार : दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी या निवडणुकीच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. याला वेगवेगळी कारणे असली तरी काहीजण हाताच्या बोटावर मोजण्याइतके सेलिब्रिटी यंदा प्रचारात दिसताहेत. शिवसेना शिंदे गटाचे आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि पक्षाचे सचिव सुशांत शेलार प्रचार करताना दिसताहेत. तसेच शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरून स्वतःच्या पक्षातील उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन जनतेला करताहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम हेही प्रचाराच्या रिंगणात दिसत आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवाराला निवडून द्या. विचाराचा वारसा अजित पवार पुढे नेताहेत, असा प्रचार करताना भाऊ कदम दिसताहेत. परंतु कित्येक निवडणूक प्रचारात दिसणारे अनेक सेलिब्रिटींनी यावेळी प्रचाराकडे पाठ फिरवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. याची अनेक कारणे असल्याचं बोललं जातंय.

सेलिब्रिटींनी का फिरवली पाठ? : मराठी किंवा हिंदीतील अनेक सेलिब्रिटी निवडणूक प्रचार करत असतात. यामध्ये अभिनेता भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, प्रिया बेर्डे, अदिती सारंगधर, संजय नार्वेकर, प्रभाकर मोरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, प्रवीण तरडे आदी सेलिब्रिटी निवडणूक प्रचार करताना याआधी दिसले होते. परंतु यावेळी या सेलिब्रिटींनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. याला कारण म्हणजे आपण एका पक्षाचा जर प्रचार केला तर दुसऱ्या पक्षाचा रोष ओढवून घ्यावा लागतो किंवा आपण एकाच पक्षाचे आहोत, एकाच पक्षाच्या विचाराच्या आहोत हा शिक्का आपल्या प्रतिमेवर बसण्याची सेलिब्रिटींना भीती सतावतेय. तसेच एका पक्षाचा प्रचार केल्यानं दुसरा पक्ष आपल्यावर नाराज होऊ शकतो. कधी कधी अशा प्रकारांमुळे सेलिब्रिटींना प्रोजेक्ट मिळण्यासही अडचण येते. परिणामी त्यांना नुकसानाची भीती सतावत असते. या भीतीने अनेक सेलिब्रिटींनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातंय.

सेलिब्रिटींचं बिझी शेड्युल :दुसरीकडे आजच्या घडीला चित्रपटसृष्टी ही चित्रपटसृष्टी न राहता मनोरंजनसृष्टी झालीय. कारण पूर्वी फक्त सिनेमा किंवा नाटक असे दोन प्लॅटफॉर्म मर्यादित होते. मात्र आजच्या घडीला सेलिब्रिटींकडे विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याच्यामध्ये चित्रपट, नाटक, मालिका, टीव्ही, वेब सिरीज, सोशल मीडिया, रेडिओ, इव्हेंट आधी प्लॅटफॉर्म सेलिब्रिटींच्या हाती असल्यामुळं त्यांचे सध्या मोठ्या प्रमाणात शेड्युल बिझी असतं. त्यांच्याकडे प्रचारासाठी डेट्स उपलब्ध नसल्यामुळंदेखील सेलिब्रिटी प्रचारात दिसून येत नाहीत, असं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितले. तर दुसरी बाजू ही आहे की, "आपण एका पक्षाचा प्रचार केला तर दुसरा पक्ष आपल्यावर नाराज होऊ शकतो. यामुळं देखील अनेक सेलिब्रिटी प्रचारात उतरत नाहीत. सध्या सेलिब्रिटींचे शेड्युल एवढे बिझी आहे की, त्यांना शूटिंगमधून वेळ मिळत नाही. देशभर दौरे, परदेशात शूटिंग, विविध इव्हेंट या प्रचंड कामांमुळं त्यांच्याकडे तारखा उपलब्ध नसतील, म्हणूनही कदाचित सेलिब्रिटी प्रचारात दिसत नसतील. काहींनी निवडणुकीच्या तारखा आणि प्रचार जाहीर झाल्यापासूनच आपलं शेड्युल बिझी करून टाकलंय. तसेच सेलिब्रिटी परदेशात शूटिंग करताहेत. ही बाजूसुद्धा सेलिब्रिटींची असू शकते. परंतु सध्या त्यांच्याकडे विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यानं त्यांचं बिझी शेड्यूल झालंय, त्यामुळं सेलिब्रिटी प्रचारात दिसत नाहीत", असं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलंय.
हेही वाचा :

  1. सुप्रिया सुळेंनी 'त्या' कार्यक्रमाला जायला नको होतं; मंत्री मुश्रीफांची समरजीत घाटगेंवर टीका - Hasan Mushrif
  2. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया - ST George Hospital Case

ABOUT THE AUTHOR

...view details