अहिल्यानगर:महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यातून निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी गेल्या सहा महिन्यांत मराठा आरक्षणासाठी काय काम केले? असा सवाल स्वराज्य पक्षाचे संस्थापक अन् अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी विचारलाय. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित, असा आपला लढा सुरू आहे, सर्व जाती-धर्माच्या लोकांना सत्तेत सहभाग मिळावा, यासाठी आपण वंचितांच्या हक्कासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध निवडणुकीत उतरलो असल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे श्रीरामपूर मतदारसंघाचे उमेदवार आणि उद्योजक जितेंद्र तोरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा घेण्यात आली होती. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती बोलत होते.
मी अन् मेटेंनीच आरक्षणासाठी प्रयत्न केले : संभाजीराजे पुढे म्हणाले की, 1902 मध्येच छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने सर्व जाती-धर्माच्या लोकांना आरक्षण दिले होते. मात्र प्रदीर्घ काळ सत्तेत असूनही राज्यकर्त्यांना मराठा आरक्षणावर त्यांना बोलावेसे वाटले नाही. आपणच 2016 मध्ये संसदेच्या सभागृहात आरक्षण प्रश्नी प्रथम भाष्य केलंय. त्यानंतर मी आणि स्व. विनायक मेटेंनी त्यासाठी सतत प्रयत्न केलेत. प्रस्थापित राज्यकर्ते वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. नुकत्याच निवडून आलेल्या महाआघाडीच्या खासदारांनी सभागृहात हा प्रश्न मांडण्याऐवजी केवळ वारंवार मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्याने काय प्रश्न सुटणार आहेत काय? असा सवालही संभाजी राजेंनी यावेळी केलाय.