पालघरःपालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा महायुतीने जिंकून आपले वर्चस्व नव्याने निर्माण केलंय. या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांचे साम्राज्य लयाला गेलंय. एवढ्या पडझडीतही आमदार विनोद निकोले यांनी मात्र आपला गड कायम राखलाय. पालघर जिल्ह्यात यापूर्वी बहुजन विकास आघाडीचे साम्राज्य होते. सहापैकी तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे होते. एका जागेवर माकपचे आमदार विनोद निकोले निवडून आले होते. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सुनील भुसारा आमदार होते, तर एका जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार होते. या पार्श्वभूमीवर या वेळी झालेल्या निवडणुकीत पालघर जिल्हा हा राज्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू झाला होता.
नालासोपाऱ्यात उगवले कमळ:नालासोपारा या मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात ही घटना घडली, त्या मतदारसंघात भाजपाचे राजन नाईक निवडून आला. त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांचा पराभव केलाय. दोन वेळा निवडून आलेल्या क्षितिज ठाकूर यांना हॅट्रिक करता आली नाही.
तीन दशकांचे साम्राज्य लयाला: गेल्या 30 वर्षांपासून वसई-विरार मतदारसंघावर आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व होते. 2009 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता तेथे कधीही अन्य कुणाला विजय मिळवता आलेला नाही. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता; परंतु त्या वेळी हितेंद्र ठाकूर उमेदवार नव्हते. त्यानंतरच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी पंडित यांचा पराभव केला. या पराभवाचे उट्टे आता दहा वर्षांनंतर विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे-पंडित यांनी काढले असून, त्यांनी वडिलांच्या पराभवाचा तर बदला घेतलाच शिवाय ठाकूर यांच्या साम्राज्याला मोडीत काढले.
पक्षांतरानंतर तरे आमदार : बोईसर विधानसभा मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीचा दबदबा होता. या मतदारसंघात आमदार राजेश पाटील हे निवडून आले होते. गेल्या वेळेला अवघ्या 4707 मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. या वेळी शिवसेनेला शिंदे गटाचे विलास तरे यांनी ठाकूर यांचा यांच्या मतदारसंघाला धक्का देत बहुजन विकास आघाडीच्या ताब्यातील हा मतदारसंघ हिसकावून घेतला. यापूर्वी तरे हे बहुजन विकास आघाडीतूनच आमदार झाले होते. नंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि नंतर पुन्हा शिंदे गट असा राजकीय प्रवास केलाय.
निकोलेंच्या साधेपणाची मतदारांना भुरळ :एकीकडे महायुती पालघर जिल्ह्यातील एक एक जागा ताब्यात घेत असताना आमदार विनोद निकोले यांनी मात्र डहाणू विधानसभा मतदारसंघाची जागा राखली. या मतदारसंघातही मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच्या दिवशी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांनी भाजपात आणल्यामुळे या मतदारसंघात काय होते याकडे लक्ष लागले होते. भारतीय जनता पक्षाने या विधानसभा मतदारसंघातून विनोद मेढा यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात पूर्वीपासून डाव्यांचे वर्चस्व असून डहाणूलगतचा शहरी भागच फक्त भाजपाच्या बाजूने आहे. त्यातच निकोले हे अतिशय साधे सरळ आणि विधानसभेत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आमदार आहेत. त्यांचा साधेपणा, चळवळीतील त्यांचा सहभाग आणि कायम जनतेबरोबर रस्त्यावर राहून कारण करणारा आमदार अशी त्यांची ओळख असल्याने महायुतीची प्रचंड ताकद त्यांच्या विरोधात उतरूनही तसेच बहुजन विकास आघाडीचा उमेदवार भाजपबरोबर जाऊनही प्रत्यक्षात आमदार निकोले यांनी या मतदारसंघात विजयश्री खेचून आणली.