मुंबई - विधानसभा निवडणुकीत निकालाचा कौल जनतेनं महायुतीच्या बाजूनं दिल्याचं आता स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची मुदत 26 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. तर सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, मागील चार-पाच दिवसांत महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून चांगलीच रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळालंय. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपातील नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, यासाठी कार्यकर्त्यांनी मंदिरात आरती केलीय. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत आणि मागील अडीच वर्षांत त्यांनी अतिशय उत्तमरीत्या राज्याच्या कारभार हाकलाय. त्यामुळं एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत. तसेच राज्यात बिहार पॅटर्न महाराष्ट्रात लागू व्हावा, असेही शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी म्हटलंय. शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी लाडक्या बहिणींनी देवाला साकडं घातलंय.
शिंदेंची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल :एकीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी जोर वाढत असताना माझ्या मुख्यमंत्रिपदासाठी कुणीही एकत्र जमू नये किंवा चर्चा करू नये, अशी पोस्ट शिंदेंनी सोशल मीडियावर केली होती. मुख्यमंत्रिपदासाठी दोन-तीन दिवस एकनाथ शिंदेंनी वातावरणनिर्मिती करत शक्तिप्रदर्शन दाखवत भाजपावर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केलाय. पण अखेर दोन दिवसांच्या मौनानंतर शिंदेंनी माध्यमांसमोर येत भाजपा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपणाला मान्य असेल, सत्ता स्थापनेच्या मध्ये आपण अडसर ठरणार नाही, असं शिंदेंनी म्हटलंय. मात्र अचानक शिंदेंच्या या बॅकफूटवर जाण्याच्या भूमिकेवरून विविध तर्कवितर्क काढले जात असून, एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे जात युतीधर्म पाळला? की त्यांची ही राजकीय अपरिहार्यता होती? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
भाजपावर सुरुवातीला दबावतंत्र वापरलं :विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागलाय. या निकालात महायुतीला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळालंय. भाजपाला 132 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 57 जागा मिळाल्या. यानंतर आपण लगेचच सरकार स्थापन करू, असं महायुतीतील नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदं यावर एकमत होत नसल्यामुळं सत्ता स्थापनेसाठी विलंब होत असून, परिणामी शपथविधी लांबणीवर गेलाय. कार्यकर्ते आणि नेत्यांची मुख्यमंत्रिपदासाठी वाढती मागणी आणि त्यांनी केलेली वातावरणनिर्मिती पाहून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपावर सुरुवातीला दबावतंत्र वापरल्याचं बोललं जातंय. एकीकडे लाडक्या बहिणींनी सिद्धिविनायक मंदिरात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी साकडे घातले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी साकडे घातले. काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम दर्ग्यात चादर चढवत एकनाथ शिंदेंसाठी दुवा मागितली. पण भाजपाचे आपल्यापेक्षा अधिक आमदार आहेत आणि त्यांच्या कृपेमुळे आपणाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांच्यामुळं आपले बंड यशस्वी होऊ शकले. हे शिंदेंना चांगलेच समजले असावे, असंही विजय चोरमारे म्हणालेत.
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून माघार घेतली :त्यामुळं सुरुवातीला भाजपावर दबावतंत्र वापरणारे शिंदे आणि शिवसेना नंतर मात्र बॅकफूटवर जात आपण युद्धधर्म पाळणार असून, सत्तास्थापनेसाठी आपण कुठेही आडकाठी आणणार नाहीत, भाजपाचे केंद्रीय पातळीवरील नेते ठरवतील तो निर्णय आपल्याला मान्य आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून माघार घेतली. परंतु आपल्या विरोधात वातावरण जात आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे वाटल्यानंतर सुरुवातीला दबावतंत्र वापरणारे एकनाथ शिंदेंनी अखेर आपण युतीधर्म पाळला, असं म्हणत माघार घेतली. दरम्यान, त्यांना माघार घेण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळं ते बॅकफूटवर गेले, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी "ईटीव्ही भारत"ला दिलीय.
युतीधर्म की राजकीय अपरिहार्यता? :महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून दिल्लीत खलबतं सुरू आहेत. गुरुवारी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान, अजूनही मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद भाजपाच्या पाठिंब्यानेच मिळणार नाही हे लक्षात येताच शिवसेना बॅकफूटवर गेली तसेच केंद्र सरकार आणि विशेषतः मोदी-शाहांनी आपणाला कशी मदत केली. राजाच्या पाठीमागे कसे खंबीर उभे राहिले, याचा वारंवार शिंदे पाढा वाचत आहेत. म्हणून आपण युतीधर्म कधी सोडणार नाही, असे जरी शिंदे म्हणत असले तरी भाजपासोबत जुळवून घेणे आणि पदरात पडतील तेवढे मंत्रिपदं मिळवून घेणे ही एकनाथ शिंदे यांची राजकीय अपरिहार्यता असल्याचेही राजकीय विश्लेषक विजय चोरमारेंनी सांगितलंय. भाजपाच्या विरोधात आपण गेलो तर आपले राजकीय भवितव्य हे फायद्याचे नसेल किंबहुना शिवसेना पक्षाला त्याचे नुकसानच होऊ शकते. त्यामुळे भाजपासोबत जुळवून घेण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आपण आधीच बंड केले आहे आणि आता कुठलेही बंड करू शकत नाही, भाजपाशी जुळवून घेण्याशिवाय गत्यंतर नाही हे शिंदेंच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी माघार घेतली. ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होती, असंही राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी म्हटलंय.
अधिक मंत्रिपद मिळवणे हे शिंदेंसमोर आव्हान? :एकीकडे महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नसताना आणि मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता लागली असताना आता दुसरीकडे महायुतीत कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? आणि कुठली खाती मिळणार? यावरही चर्चा होत आहे. सुरुवातीच्या फॉर्मुल्यानुसार भाजपाला 10 तर शिवसेना आणि अजित पवार गटाला 5-5 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदं पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. यासोबत गृहमंत्रिपदसुद्धा शिवसेनेला पाहिजे असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना जरी उपमुख्यमंत्रीपद दिले तरी ते स्वीकारतील की नाही? हा पण एक प्रश्नच आहे. परंतु महसूल खाते, नगरविकास खाते आणि गृह खाते या महत्त्वाच्या खात्याची मागणी शिवसेनेनं भाजपाकडे केलीय. त्यामुळे चांगली खाती आणि अधिकाधिक खाती मिळवणं हे एकनाथ शिंदेंसमोर आव्हान असल्याचं बोललं जातंय. त्यातच पक्षातील आमदारांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं असंतुष्टांची नाराजी दूर करणे आणि त्यांची मनधरणी करून त्यांना शांत करणे हेसुद्धा एकनाथ शिंदेंसमोर आव्हानच आहे. तसेच ते या आव्हानाला कसे सामोरे जातात, यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
- दिल्लीश्वरांच्या वटारलेल्या डोळ्यांना बंडखोर घाबरत नाहीत-संजय राऊत
- 'शब्द पाळण्याची भाजपाची परंपरा नाही;' खासदार संजय राऊत यांची टीका