मुंबई –बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिल्याने आता पालिकेने सर्व तयारी पूर्ण केलीय. पालिका आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 मतदार हे मुंबईतील 420 मतदारांचे भवितव्य ठरवणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलीत. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नसताना सेल्फी कशी घ्यायची? अशी कुजबूज सध्या मुंबईकर मतदारांमध्ये आहे.
मतदान केंद्रांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात :महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वी 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदान पार पडलंय. यात मुंबईतील 6 हजार 272 ज्येष्ठ नागरिकांनी गृह मतदानाचा हक्क बजावल्याचे पालिकेने म्हटलंय. सोबतच बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानासाठी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा हजार 117 मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती देखील पालिकेने दिलीय. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी एकूण 46 हजार 816 कर्मचारी तैनात करण्यात आले असून, बंदोबस्तासाठी एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.
23 हजार 927 दिव्यांग मतदार :मुंबईत एकूण 76 संवेदनशील मतदान केंद्र असून, त्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात आलीय. यावर्षी निवडणूक आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या प्रयत्नाने काही प्रयोगदेखील करण्यात आले असून, मतदान केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी या मतदान केंद्रांची मदत होणार आहे, अशी एकूण 84 मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. या मॉडेल मतदान केंद्रांमुळे मतदान केंद्रांवर हो णारी गर्दी, मतदानासाठी लागणारा वेळ हे सर्व टाळण्यासाठी याचा त्याची मदत होणार आहे. निवडणूक आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 मतदार असून, यात 54 लाख 68 हजार 361 पुरुष मतदार, 47 लाख 61 हजार 265 महिला मतदार आणि 1 हजार 82 तृतीयपंथी मतदार आहेत. यात 23 हजार 927 दिव्यांग मतदार देखील आहेत. या सर्व मतदारांना सुरळीत मतदान करता यावे यासाठी एकूण 14 हजार 172 ईव्हीएम बॅलेट युनिट, 12 हजार 120 कंट्रोल युनिट, 13 हजार 131 व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.