मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची आचार संहिता देशात कधीही लागू शकते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा केली जात आहे. भाजपानं दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यात विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला तर नव्यांना उमेदवारी देण्यात आली. महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील लोकसभा उमेदवारीचं तिकीट दिल्यानं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चिमटा काढला आहे. "सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा केला आहे," अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
शिवानी वडेट्टीवार काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडं :चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी तिकिटाची मागणी करत आहेत. याबाबत विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता, विजय वडेट्टीवार म्हणाले की, "माझी मुलगी शिवानी पक्षश्रेष्ठींकडं तिकीट मागत आहे. तिकीट दिलं तर निवडणूक लढू, अन्यथा ज्याला तिकीट देतील त्यांच्यासाठी काम करणार आहे."
सुधीर मुनगंटीवार हे बळीचा बकरा :"सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा केलाय असं आता वाटत आहे. माझं तिकीट मीच कापणार म्हणाले होते. त्यांचं तिकीट पक्षानं कापलं नाही, मात्र जनता त्यांची दिल्लीकडं जाणारी वाट अडवेल. आता त्यांच्याबाबत येणारा काळ सांगेल," असा टोला वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे. मात्र "बिचारे सुधीर मुनगंटीवार, इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तिकीटाच्या माध्यमातून त्यांच्या गळ्यात वरमाला घातल्याचं सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे," असं ते म्हणाले.
लाकूड भाजपाच्या प्रांगणातला नाही :"चंद्रपूरचं लाकूड नवीन संसद भवनाच्या दरवाजाला दिलं आणि त्या दरवाज्यातून मला संसद भवनात प्रवेश मिळेल, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितलं. मात्र सदरचं लाकूड चंद्रपूर जंगलातलं असून भाजपाच्या जंगलातलं किंवा प्रांगणातलं नाही. चंद्रपूर जिल्हा हा पूर्णपणे काँग्रेसचा जिल्हा असून जनता काँग्रेस उमेदवाराला निवडून देईल," असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. "जिल्ह्यात तीन विधानसभा आमदार आणि विधान परिषदेचे दोन आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. तर भाजपाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे आमची ताकद जास्त आहे. अशा परिस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांचा दिल्ली प्रवेश सुखकर होईल की कठीण जाईल, यावर येणाऱ्या काळात बोलू," असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
- मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा : विजय वडेट्टीवार
- शरद पवार यांनी 'तुतारी' हे चिन्ह विरोधकांना वाजवण्यासाठी घेतलं असावं- वडेट्टीवार
- एखादी व्यक्ती पक्ष सोडून गेल्यानं पक्ष व्यथित झाला असं नाही; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल