मुंबईLOK SABHA ELECTIONS :लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये अजून अंतिम निर्णय झालेला नाही. शनिवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही जागा वाटपाचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. शनिवारी रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत बैठक चालली. तीन तास बैठकीत जागा वाटपावरून चर्चा झाली, मात्र यातून कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची आज (रविवारी) देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत 7 जागावर लढण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
कोणत्या आहेत सात जागा? : आजच्या बैठकीत सात जागा जागावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. यात सात जागांमधील बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी, गडचिरोली या सात जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही सात जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला आहे. भाजपालाही सात जागांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. या सात जागांचा प्रस्ताव देखील काल (शनिवारी) अजित पवार यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शाह यांच्यासमोर मांडला आहे.