अमरावती Amravati Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (27 फेब्रुवारी) मतदार जागृतीसाठी रथयात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या संकल्पनेतून ही मतदार जनजागृती रथयात्रा मतदार संघातील शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृती करणार आहे.
14 तालुक्यांमध्ये पोहोचणार मतदार जनजागृती रथ : 'आपलं मत मतदानातुनच व्यक्त करा' असा संदेश देत आज जिल्हा परिषद आवारातून मतदार जनजागृती रथाची मोहिम सुरू झाली. ही मोहिम अमरावती, बडनेरा, तिवसा, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चिखलदरा, धारणी तसंच वर्धा लोकसभा मतदार संघात येणाऱ्या वरुड, मोर्शी, चांदुर रेल्वे ,धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांमध्ये मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यासाठी सुरू राहणार आहे.
असा आहे 'मतदार जागृती रथ' : जिल्ह्यातील 14 तालुक्यात येणाऱ्या सर्व गावांमध्ये हा मतदार जागृती रथ जाणार आहे. या रथाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगण्यात येणार आहे. तसंच मतदान केंद्रांवर कोणत्या सुविधा असतील? यासंदर्भातील माहिती देखील मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन मतदारांची नोंदणी आणि मतदार यादीतील नाव कसं शोधावं, याबाबतची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मतदार जागृतीसाठी सेल्फी पॉईंट :जिल्हा परिषद परिसरात मतदार जागृतीसाठी खास सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी सेल्फी काढला. तसंच जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या खास सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा -
- अमरावती विद्यापीठात आता 'हिरकणी कक्ष'; स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र खोली
- मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाचा अनोखा फंडा, घेण्यात येणार 'या' स्पर्धा
- अमरावतीतील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना 'या' तारखेपर्यंत होणार पूर्ण; महिन्याला 180 रेल्वे वॅगन तयार करण्याची क्षमता