कोल्हापूर - Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही, असं म्हणतात. नेहमी येथे जगावेगळं काहीही घडत असतं, याची प्रचिती मंगळवारी पार पडलेल्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेतदेखील दिसून आली. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर आणि ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान पार पडलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ७०.३५ टक्के मतदान झाले तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे ६८.०७ टक्के मतदान झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. काही ठिकाणी किरकोळ वाद झाला. मात्र संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे.
सर्वाधिक मतदान कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात:राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. ५ मे रोजी प्रचाराची सांगता झाल्यानंतर काल ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले. राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे, तर सर्वात कमी मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ७०.३५ टक्के मतदान पार पडले. तर सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये ७८.८९ टक्के झाले आहे. तर सर्वात कमी कोल्हापूर दक्षिणमध्ये ६४.५४ टक्के झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ६८.०७ टक्के मतदान पार पडले . सर्वाधिक मतदान शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ७०.९६ टक्के इतके झाले. तर सर्वात कमी शिराळा विधानसभा मतदारसंघात ६५.९६ टक्के झाले. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिये दरम्यान सोशल मीडियावर आचारसंहिता भंगाची १३ प्रकरणे निदर्शनास आली आहे. यापैकी ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधित ८ प्रकरणांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
गत दोन लोकसभेच्या तुलनेत मतदान कमीच:यंदा राज्यातील निवडणुकीचा मतदानाचा टक्का घसरला. त्याचे परिणाम हे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्येदेखील पाहायला मिळाले. यंदा २०२४ च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान जरी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झाले असले तरी २०१९ ला पार पडलेल्या मतदानाच्या तुलनेत यंदाची टक्केवारी ही कमीच पाहायला मिळाली. उन्हाचा तडाका आणि गेल्या काही वर्षात राजकारणामध्ये सुरू असलेले घडामोडी यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी मतदानाकडं पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.
- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी:
२०१४ ला झालेलं मतदान - (७१.७%)
२०१९ ला झालेलं मतदान - (७४.२%)
२०२४ ला झालेलं मतदान - (७०.९६%)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी:
२०१४ ला झालेलं मतदान - (७२.९%)
२०१९ ला झालेलं मतदान - (७४.४%)
२०२४ ला झालेलं मतदान - (७०.९६ %)