छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Lok Sabha election results 2024 : संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. अशातच कोण निवडून येणार अशी धाकधूक प्रत्येकाच्या मनात आहे. त्यात अनेक उमेदवारांनी देवाच्या दारी विजयासाठी साकडं घालत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी चक्क आठ तास होम हवन केलं. एम.आय. एम. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अजमेर दर्गा येथे जाऊन चादर चढवली. तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आपले उपचार पूर्ण केलं असून त्यांच्या पत्नीने देवाकडे साकडं घातलं आहे. त्यामुळं आता देव कोणाला पावणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खैरे यांचा धार्मिक दौरा आणि पूजा : १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर ठाकरे गट शिवसेना उमेदवार यांनी विजयासाठी देवाकडे धावा केला. आधी तुळजापूर येथे जाऊन कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचं सहकुटुंब दर्शन घेतलं. त्यानंतर लगेच ते कश्मीर येथील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले. मागील पंधरा दिवसांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंदिरांमध्ये सहकुटुंब दर्शन घेत आपल्या विजयासाठी साकडं घातलं. तर रविवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवस राहिला असताना चंद्रकांत खैरे यांनी निकाल आपल्याच बाजूनं लागावा यासाठी खुलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विचित्रवीर हनुमान याग केला. ११ ब्राह्मणांच्या उपस्थितीत यज्ञ करण्यात आला. सलग आठ तास त्यांनी होम हवन करत विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी आपण दर वेळी निवडणुकीच्या आधी आणि नंतर पूजा करतो. यंदा उध्दव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगलं यश मिळू दे अशी प्रार्थना केल्याचं यावेळी खैरे यांनी सांगितलं.