हैदराबाद Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल मंगळवारी 4 जूनला जाहीर करण्यात आला. या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती आल्यानं अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपाचं स्वप्न धुळीला मिळालं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र दुसरीकडं या निवडणुकीत महिला उमेदवारांनी चांगलीच बाजी मारली आहे. चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी पतीच्या निधनानंतर डगमगून न जाता मोठ्या धैर्यानं लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत धानोरकर यांनी भाजपाचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.
बारामतीत नणंद भावजईमध्ये भावजई ठरली वरचढ : बारामती लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडं देशभरातील नागरिकांचं लक्ष लागलं होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भावजय असलेल्या सुप्रिया सुळे यांनी नणंद सुनेत्रा पवार यांच्यावर मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार अशीचं रंगली. यात काका शरद पवार यांची सरशी झाल्याचं दिसून आलं.
पती निधनानंतर मारली प्रतिभा धानोरकरांनी बाजी :चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसनं राज्यात एकमेव असलेला खासदार गमावला. मात्र त्यानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी डगमगून न जाता मोठ्या धैर्यानं निवडणूक लढवली. विजय वडेट्टीवार यांच्यासारखा पक्षांतर्गत विरोधक असतानाही प्रतिभा धानोरकर यांनी एकेकाळचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत केलं. त्यांच्या या विजयानं काँग्रेसला राज्यात मोठं बळ मिळालं आहे.
वर्षा गायकवाड यांनी राखला मुंबईचा गड :मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पक्षाची मुंबईत धुरा सांभाळताना भाजपाच्या उज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांची लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये सुरुवातीपासून पिछेहाट झाली होती. मात्र अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी तब्बल 56 हजार मतांची लीड तोडून उज्वल निकम यांना पराभवाला सामोरं जाण्यास भाग पाडलं. उज्वल निकम यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना फासावर लटकावण्यात महत्वाची भूमिका निभावली. मात्र तरीही त्यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला नागरिकांनी नाकारलं.