अहमदनगर Lok Sabha Election 2024 :उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर इथं जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली. "मी नकली, तर तुम्ही XXXX असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. माझ्या आई वडिलांचा अपमान करणार असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल," असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
नकली पूत्रावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल :तेलंगणातील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे नकली पूत्र आहेत, असा उल्लेख केला. पंतप्रधानांच्या टीकेनं उद्धव ठाकरे चांगलेच बिथरले. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचा श्रीरामपूर इथं चांगलाच समाचार घेतला.
पंतप्रधान मोदींना सगळीकडं उद्धव ठाकरेच दिसतात :शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर इथं गुरुवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना, "पंतप्रधान मोदींना सगळीकडं केवळ उद्धव ठाकरेच दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील एका सभेदरम्यान पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा नकली पूत्र आहे. पंतप्रधान मोदीजी मी नकली असेल तर तुम्ही XXXX आहेत. हा माझा अपमान नाही. हा माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा आणि माझ्या आईचा अपमान आहे. त्यांच्यावर कदाचित आई वडिलांचे संस्कार झाले नसतील. पण माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घरातला आहे," असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.