बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेविषयी सांगताना संबंधित अधिकारी (Reporter) बीड Beed Lok Sabha Constituency: बीड लोकसभेसाठी प्रत्यक्षात सोमवारी मतदान होणार आहे. याचीच तयारी आता अंतिम टप्प्यात असून जिल्हा प्रशासनाच्या नियोजनात ही मतप्रक्रिया पार पडणार आहे. आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मतदानाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चोख तयारी करत निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना केलं आहे.
एवढ्या केंद्रावर होणार वेब कास्टिंग :बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 41 उमेदवार आहेत. यासाठी बीड जिल्ह्यात 2 हजार 355 मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर यापैकी 1 हजार 177 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाच्यावतीने लावण्यात आले आहेत. यामध्ये गेवराई-199, माजलगाव-189, बीड-191, आष्टी-220, केज-207, परळी-171 असे एकूण 1177 केंद्रावर वेब कास्टिंग होणार आहे. विशेष म्हणजे, या 2 हजार 355 मतदान केंद्रापैकी 17 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत. यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्यावतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यामध्ये होणार तिहेरी लढत :यामध्ये मुख्य लढत ही महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अशी आहेत. बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्यामध्येही तिहेरी लढत होणार आहे. त्यामुळे जनता नेमकी कोणाला कौल देणार? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.
प्रशासन सक्रिय :महायुती आपला गड राखण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. तर दुसरीकडे महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली जावी यासाठी प्रशासनानेही युद्धपातळीवर तयारी केली आहे. 2355 मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत कुठलीही धांदल होऊ नये यासाठी असामाजिक तत्त्वांना आवर घालावा म्हणून पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.
हेही वाचा:
- "1999 पासूनच उद्धव ठाकरे...", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis
- "मोदींनी दहा वर्षे फक्त थापा मारल्या, पुन्हा निवडून आल्यास..."उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - uddhav thackeray interview
- तुरुंगातून सुटून आलेल्या अरविंद केजरीवाल यांचा मोदींच्या गॅरंटीला मोठा शह, जाहीर केली मोठी घोषणा - Arvind Kejriwal news