मुंबई Dispute For Six Seats In Mahayuti : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) दोन टप्पे पूर्ण झाले असून राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 मे हा शेवटचा दिवस आहे. मात्र, असं असताना महायुतीकडून राज्यातील 6 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा न झाल्यानं इच्छुक उमेदवारांबरोबर कार्यकर्त्यांची ही धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे ज्या 6 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा बाकी आहे. त्या सर्व जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कोट्यातील आहेत. अशात या 6 जागांपैकी काही जागांवर भाजपाकडून अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्यामुळं कल्याण-डोंबिवलीचा उमेदवार ठरेना : दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण-डोंबिवली, ठाणे, नाशिक आणि पालघर या 6 जागांवर अद्याप उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे. येत्या 1 ते 2 दिवसात या जागांची घोषणा केली जाईल, असं वक्तव्य मागील 15 दिवसांपासून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून होत आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आणि त्याची तयारी करण्यासाठी फारच कमी कालावधी शिल्लक राहिल्यानं याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली असली तरी श्रीकांत शिंदे यांच्या पक्षाकडून अद्याप त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणं बाकी आहे. ठाण्यामध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा न झाल्याकारणानं कल्याण-डोंबिवलीमध्ये अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा होण्यास उशीर होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतु, ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाकडूनही दावा केला जात असल्यानं येथील चित्र अद्याप स्पष्ट नाही. तर या मतदारसंघातून शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेंद्र म्हस्के हे इच्छुक आहेत.
दक्षिण मुंबई आणि मुंबई उत्तर पश्चिममध्येही चढाओढ : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघावर शिंदे सेना आणि भाजपा या दोन्ही गटाकडून दावा केला जातोय. शिंदे गटाकडून या मतदारसंघात भायखळाच्या आमदार यामिनी जाधव तर भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच मंत्री मंगल प्रभात लोढा या दोन नावांची चर्चा आहे. परंतु एकनाथ शिंदे या मतदारसंघावर ठाम आहेत. त्यामुळं हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत मोठी उत्सुकता असून याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
दुसरीकडं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म सुद्धा दिलाय. अमोल कीर्तिकर हे 2 मे ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे आपल्या पुत्राविरोधात निवडणूक लढण्यास तयार नाहीत. तसंच या मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या दोन्ही नावास मनसेनं विरोध दर्शवल्यानं अशा परिस्थितीत या ठिकाणाहून शिंदे गटाकडून कुठला उमेदवार घोषित केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.