पुणे (आंबेगाव)Live Larvae Found in Milk : पुण्याच्या घोडेगाव येथील निवासी आदिवासी इंग्रजी आश्रम शाळेत (Tribal Ashram Schools) धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना नाश्यातमध्ये दिल्या जाणाऱ्या पॅकिंग दुधात जिवंत अळ्या (Live Larvae)आढळून आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी इथल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या. मात्र आता पुन्हा असाच प्रकार घडल्यानं शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या जीवाशी तर खेळत नाही ना? असा संतप्त सवाल आदिवासी ब्रिगेडने विचारला आहे.
पोषण आहारातील दुधात आढळल्या अळ्या : याबाबत अधिक माहिती अशी की, घोडेगाव येथे इंग्रजी माध्यमाची आश्रम शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात दूध दिलं जातं. परंतु विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या दुधाच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळून आल्या. याबाबत विद्यार्थ्यांनी बिरसा ब्रिगेडला माहिती दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी आणि त्यांचे सहकारी समीर गाडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर प्रकाराची चौकशी करत अळ्या असलेल्या दुधाची पोलखोल केली.
काय म्हणाले बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी? :घोडेगाव मध्यवर्ती सेंट्रल किचनमार्फत विद्यार्थ्यांना पोषक आहार आणि दूध वितरण करण्याची जबाबदारी आहे. याच सेंट्रल किचन माध्यमातून घोडेगाव, जुन्नर, आंबेगाव भागातील आश्रम शाळांना जेवण दिलं जातंय. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच गोहे आश्रम शाळेत जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर आठ दिवसांनी अजनान सोनावले आश्रम शाळेत खाकऱ्यामध्ये अळ्या आढळल्या होत्या. हे प्रकार वारंवार घडत असतानाच आज पुन्हा एकदा निवासी आदिवासी इंग्रजी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नाष्ट्यात दिल्या जाणाऱ्या पँकिंग दुधात जिवंत अळ्या आढळल्या. एका नामांकित कंपनीचे 200 मिली टेट्रापॅक दूध दिलं जातं. त्या पॅकमध्ये अळ्या आढळल्या. ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. ठेकेदारांच्या मार्फत अतिशय निकृष्ठ दर्जाचे दूध आश्रम शाळेत वितरण केलं जातं.
''आदिवासी विकास विभाग, संबंधित ठेकेदार आणि त्यांची यंत्रणा ही आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळत आहे. आदिवासी मुलांना मागेल त्या वसतिगृहात प्रवेश मिळावा, वसतिगृहाच्या जागा वाढवून मिळाव्यात, सेंट्रल किचन पद्धत बंद व्हावी आणि अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी आम्ही सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की, येत्या 6 तारखेला धरणे आंदोलनात सहभागी व्हा.'' - समीर गाडे, पदाधिकारी (बीरसा ब्रिगेड)
"आदिवासी आश्रम शाळेत भेट देऊन मुख्याध्यापक नायकडे यांच्याशी घटनेची माहिती घेतली. दुधाची तपासणी केली असता दुधात अळ्या असल्याचं निदर्शनास आलं. तर 1 तारखेला उंदरांनी थोडे बॉक्सेस कुरतडले होते. त्यामुळं दुधात अळ्या सापडून आल्या होत्या. परंतु,आज न कुरतडलेलं पॅकेट चेक केलं असता त्यामध्ये देखील अळ्या सापडल्याचं निष्पन्न झालं. दुधाचं सँपल पुण्यातील अन्न आणि औषध विभागाकडं पाठवलं आहे. चौकशी करून संबधित ठेकेदारांवर कारवाई करणार आहोत.'' - संदीप पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी